दहिसर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी सुटणार (फोटो सौजन्य-X)
भाईंदर, विजय काते : दहिसर टोलनाका हा मुंबई प्रवेशद्वारातील प्रमुख टोल नाका असल्याने येथे सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी शेकडो वाहनचालकांना या समस्येला सामोरे जावे लागते. वाढत्या वाहतुकीमुळे प्रवासाचा वेळ वाढत असून, इंधन आणि वेळेची नासाडीही होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली (RTO) यांनी महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या आहेत.
या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. टोलनाका व्यवस्थापन करणाऱ्या खासगी कंपनीसह दहिसर आणि मीरा-भाईंदर विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या उपाययोजनांची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
१) जड मालवाहू वाहनांमुळे टोलनाक्यावर वाहतूक कोंडी
समस्या: सकाळी ८ ते ११ या वेळेत जड वाहनांना मुंबईत प्रवेश करण्यास बंदी आहे. त्यामुळे ही वाहने टोलनाक्याच्या आधीच रस्त्याच्या कडेला थांबतात. यामुळे टोलनाका ते मीरा-भाईंदर उड्डाणपूल आणि पुढे फाऊंटन चौकापर्यंत वाहतूक कोंडी होते.
उपाय: सदरची जड वाहने डाव्या सर्व्हिस रोडवर सक्तीने उभी करणे किंवा चौकातील मोकळ्या जागेत थांबवणे. यामुळे मुख्य रस्ता वाहतुकीसाठी मोकळा राहील आणि इतर वाहने वेगाने पुढे जाऊ शकतील.
२) टोलनाका पार केल्यानंतर मार्ग बदलताना वाहतूक खोळंबा
समस्या: टोलनाका ओलांडल्यानंतर लगेचच रस्ता दुभंगतो.दहिसर (पश्चिम) कडे जाणारी वाहने उजव्या मार्गिकेतून डावीकडे वळतात. डाव्या मार्गिकेतून उड्डाणपुलाकडे जाणारी वाहने समोरून येणाऱ्या वाहनांना अडथळा करतात.जड वाहने चढण असल्याने वेग पकडण्यास वेळ घेतात, परिणामी इतर वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
उपाय: टोल वसुली बूथ सध्याच्या ठिकाणाहून २०० मीटर पुढे हलवणे. यामुळे वाहनांना टोल पार केल्यानंतर मार्ग बदलण्यासाठी आणि वेग वाढवण्यासाठी पुरेसा अवधी व अंतर मिळेल. टोल पार करताच वाहनांना मार्ग बदलावा लागू नये यासाठी योग्य सिग्नल आणि लेन व्यवस्थापन केले जाईल.
३) मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर पाणी साचून अपघात
समस्या: मेट्रोच्या कामामुळे बाहेर पडणारे पाणी रस्त्यावर जमा होते, त्यामुळे रस्ता निसरडा होतो. या निसरड्या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी घसरून अपघात होतात. त्यामुळे प्रशासनाला काही वेळा रस्त्याचा काही भाग बॅरिकेडिंग करून बंद करावा लागतो, परिणामी वाहतूक कोंडी वाढते.
उपाय: रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी ड्रेनेज सिस्टम विकसित करणे. मेट्रोच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाणी योग्य प्रकारे बाजूला वळवले जाईल. टोल नाक्याजवळील निसरड्या भागावर अँटी-स्किड सोल्युशन वापरले जाणार आहे.
४) बेस्ट बस थांब्यामुळे रस्ता अरुंद
समस्या: टोलनाक्याच्या अलीकडेच बेस्टचा बस थांबा आहे. एका वेळी दोन बस आल्यास त्या समांतर उभ्या राहतात, परिणामी रस्ता अरुंद होतो आणि वाहतुकीची कोंडी वाढते.
उपाय: बस थांब्यासाठी बॅरिकेटिंग करून वेगळे लेन निर्माण करणे. या लेनमध्येच बस थांबवण्याचे निर्देश दिले जातील, जेणेकरून इतर वाहतूक सुरळीत राहील.
दहिसर टोलनाका आणि आसपासच्या वाहतूक कोंडीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सूचनांचे स्वागत करून लवकरच कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.
टोलनाका व्यवस्थापन कंपनीला उपाययोजना करण्याच्या सूचना
दहिसर आणि मीरा-भाईंदर वाहतूक पोलिसांच्या मदतीने लेन व्यवस्थापन सुधारणा
सर्व्हिस रोडचा योग्य वापर करून वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध करणे
ट्रोच्या बांधकामस्थळी जलनिचर व्यवस्थापन मजबूत करणे
दरम्यान ही सर्व सुधारणा अंमलात आणल्यानंतर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.






