मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पीएमएलए न्यायालयात (PMLA Court) दाखल केलेल्या जामीनासाठी अर्जावरील सुनावणीदरम्यान, सीबीआयच्यावतीने देशमुखाच्या स्विय सहाय्यक संजीव पालांडे (Sanjeev Palande), कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची (Sachin Waze) पुन्हा चौकशी (Inquiry) करण्यासाठीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने सीबीआयचा अर्ज (CBI Application For Inquiry) मान्य करत सीबीआयला पुढील दोन दिवस चौकशी करण्यास संमती दिली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. २१ एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून १२ तास चौकशी केल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. २९ डिसेंबर २०२१ रोजी ईडीने देशमुखांविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केले. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र आहे. आरोपपत्रानुसार देशमुख या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. देशमुखांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामीन अर्ज केला आहे.
माजी गृहमंत्र्यांचे वय आता ७३ झाले आहे. त्यांना अनेक शारीरिक व्याधींही ग्रासले असून ते तीन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असल्याचा दावा देशमुखांच्यावतीने बाजू मांडताना ज्येष्ठ विधीज्ञ विक्रम चौधरी यांनी केला. तसेच हे प्रकरण परमबीर आणि वाझेच्या वक्तव्यांवर आधारित असून जेव्हा प्रकरणाची सुनावणी पार पडते आहे त्याआधी देशमुखांच्या कुटुंबियांच्या घरांवर, कंपन्यांवर ठापे टाकले जातात. आतापर्यंत १४ वेगवेगळ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणेकडून ७० वेळा ठापेमारी केली असल्याचा दावाही त्यांनी केला. देशमुख आजारी आहेत या कारणांसाठी जामीन मागत नसून या प्रकरणात शिक्षा झाल्यास जास्तीत जास्त ७ वर्षांची आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
अनिल देशमुखांचे स्विय सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांची यासंदर्भात आणखी चौकशी करण्यासाठी सीबीआयकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला. या दोघांचेही जबाब नोंदविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली. त्याची दखल घेत पालांडे आणि शिंदे यांची अनुक्रमे १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी आर्थर रोड कारागृहात जाऊन चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने सीबीआयला दिली.
वाझेचीही चौकशी होणार
दुसरीकडे, बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेचीही चौकशी करण्याची मागणी तपास यंत्रणेकडून करण्यात आली. त्याचीही अनुमती देत न्यायालयाने सीबीआयला मंगळवार आणि बुधवार( १४ आणि १५ फेब्रुवारी) या दोन दिवशी तळोजा कारागृहात जाऊन सचिन वाझेचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास परवानागी दिली.