मुंबई : कोरोनाची लाट ओसरत चालल्यामुळे पुन्हा एकदा शाळा आणि महाविद्यालयाचे दार खुले होत आहे. राज्यातील महाविद्यालय १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग १ फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष १ फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहे. परंतु कोविडची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापिठ आणि स्थानिक प्रशासनाला असेल ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पुर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रवेश मिळणार. १५ फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात तर त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या किंवा ऑनलाईन याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार आहे.
गेल्या दोन वर्षापासून शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अलीकडेच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण, आता पालकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी होत आहे. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील शाळा सुरु करण्यास होकार दर्शवला आहे.
‘आता शाळा सुरू केल्या आहे. जवळपास सगळीकडे ज्युनिअर कॉलेज सुरू केले आहे. शाळा सुद्धा सुरू झाल्या आहेत. जालना शहरात सुद्धा लक्ष ठेवून आहोत. १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा आपला मानस आहे. आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याचा विचार करत आहोत, असं राजेश टोपे म्हणाले.
विद्यार्थ्यांना जर कमी प्रमाणात कोरोनाची लागण झाली तरी मुलांना कुठलेच लक्षण दिसत नाही, ते लगेच बरेही होत आहेत. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी १ फेब्रुवारीपासून शाळा सुरु करण्याचा जालन्यात निर्णय घेतल्याचे टोपे यांनी सांगितले.