मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली (फोटो - सोशल मीडिया)
मंत्री नरहरी झिरवाळ हे मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये आले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनामधील कारवाईनंतर विरोधकांनी राजीनाम्याची देखील मागणी केली. मात्र यानंतर आता त्यांच्या दिंडोरी मतदारसंघातील रासेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केली आहे. रासेगावच्या विद्यमान सरपंच मंदा विठ्ठल बेडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेडकुळे यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. यामुळे फक्त नाशिकमध्ये नाही तर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा : भाजप कार्यकारणीत मोठा ट्वीस्ट; सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरूण लखानी यांची वर्णी
रासेगाव ग्रामपंचायतीमध्ये वाद निर्माण झाला होता. या पंचायतीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव आणण्याची प्रक्रिया सुरू होती. हा अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी आणि त्या प्रक्रियेत संबंधित सदस्याला मदत करण्याच्या बदल्यात सरपंच मंदा बेडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेडकुळे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या मागणीबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीने तातडीने या तक्रारीची शहानिशा केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर झालेल्या तडजोडीत ही रक्कम २५ हजार रुपये देण्याचे ठरले.
मीडिया रिपोर्टनुसार, ठरवण्यात आलेल्या २५ हजार रुपयांपैकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरले होते. नाशिक एसीबीच्या पथकाने दिंडोरी परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जेव्हा विठ्ठल बेडकुळे आणि सरपंच मंदा बेडकुळे यांनी १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मतदारसंघातील या लाचखोरीच्या प्रकरणामुळे मंत्री नरहरी झिरवाळ हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. यावेळी नरहरी झिरवाळ उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी बैठकीमध्ये या घटनेवर झिरवाळ यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले असणार आहे. मात्र यानंतर आता पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.






