शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली 'पाण्याखालची द्वारका'
७०-८० कारागीरांनी घेतली अहोरात्र मेहनत
तब्बल १३० फूट लांब, ६५ फूट रुंद आणि ४५ फूट उंच असलेल्या या भव्य देखाव्यात सुमारे १,००० चौरस फूट एलईडी स्क्रीन, अत्याधुनिक होलोग्राम तंत्रज्ञान, लेझार लाईट इफेक्ट्स आणि वातानुकूलित सेट यांचा वापर करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यापासून ७० ते ८० कारागीर अहोरात्र मेहनत घेतली.
पौराणिक द्वारका यंदा शिवडीत अनुभवता येणार
प्रबोधनकार ठाकरे उद्यान, शिवडी बस डेपोसमोर, शिवडी, मुंबई येथे हा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. गुजरातमधील गोमती नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेली पौराणिक द्वारका यंदा शिवडीत अनुभवता येणार आहे. प्रसिद्ध कला संचालक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून हा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. गुजरातला जाऊन पाण्याखालची द्वारका पाहणे सामान्य नागरिकांना सहज शक्य होत नाही. त्यामुळे शिवडीच्या राजाने ही बुडालेली द्वारका मुंबईकरांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जवळ आणण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.
समृद्ध परंपरेची साक्ष; सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य
मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव म्हणाले, शिवडीच्या राजाची ७५ वर्षांची वाटचाल ही श्रद्धा, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि समाजातील एकोपा जपणाऱ्या समृद्ध परंपरेची साक्ष आहे. अमृतमहोत्सवी वर्षात ही परंपरा अधिक व्यापक करत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. यंदाच्या उत्सवातील हा आगळावेगळा सोहळा भाविकांनी अनुभवावा, ‘पाण्याखालची द्वारका’ पाहावी आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन मी सर्व भाविकांना करतो. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विजय इंदुलकर म्हणाले, शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यंदा काहीतरी आगळेवेगळे अनुभवता यावे, या हेतूने ‘पाण्याखालची द्वारका’ ही संकल्पना साकारण्यात आली आहे. पौराणिक कथांमधील श्रीकृष्णाची नगरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष उभारण्याचा हा प्रयत्न आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






