महाराष्ट्र विधानसभा निकाल लागून दहा दिवस झाले. शपथविधीच्या तारखेचीही घोषणा झाली मात्र तरीही मुख्यमंत्री कोण होणार हे गुलदस्तात आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सध्या मोठा तिढा निर्माण झाला आहे. आता एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर होण्यासाठी आणि महायुतीमधील तिढा सोडवण्यासाठी आरपीआय पक्षप्रमुख केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक महत्वाचा सल्ला दिला आहे.
रामदास आठवले यांनी सूचवला उपाय
आठवले यांनी सांगितले की, माझे मत आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकार केले होते. त्यानुसार आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची संधी घ्यावी. जर ते हे पद स्वीकारण्यास तयार नसतील तर त्यांना महायुतीचे अध्यक्ष बनविले पाहिजे किंवा ते केंद्रात येऊ शकतात.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून निवडले जातील
रामदास आठवले यांनी सांगितले की, भाजपच्या वरिष्ठांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले की ते त्यांना मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाही आहेत. कारण मागील अडीच वर्षांचा कार्यकाल शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून दिला गेला होता. भाजपचे मत आहे की मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा आणि उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव असले पाहिजे, मात्र त्यांनी अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही. तसेच आठवले यांनी मुख्यंमंत्रीपद कोणाला मिळावे या करिता आपले मतही मांडले ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले त्यांना मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे.त्यामुळे ते मुख्यमंत्री म्हणून निवडले जातील असे मला वाटते.
मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हे उद्या कळणार
महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र तो नेमका कोण असेल हे अजूनही सांगता येत नाही. उद्यापर्यंत या नावाची घोषणा केली जाणार आहे. याकरिता अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे निरीक्षक आहेत. ते यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत.
देवेंद्र फडणवीसांचे नाव आघाडीवर मात्र भाजप करु शकतो धक्कातंत्राचा वापर
देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असले तरी गेल्या आठवड्याभरात अनेक नांवांची चर्चा केली गेली आहे. त्यामध्ये पुण्याचे खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचा समावेश आहे.भाजप मुख्यमंत्रीपदासाठी मराठा कार्ड खेळू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत असल्याने या चर्चांना जोर आला आहे. मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत चर्चा वायफळ असल्याचे जाहीर केले. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भाजपने धक्कातंत्राचा वापर करत नवख्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. त्यामुळे आता उद्या काय घोषणा होणार याची सर्वत्र चर्चा आहे.