पालिका निवडणुका(फोटो-सोशल मीडिया)
Shekap on the backfoot due to party splits : शेतकरी कामगार पक्ष सध्या गंभीर अस्तित्वाच्या संकटातून जात आहे. २०१७ च्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले अनेक नगरसेवक सध्या भारतीय जनता पक्षाच्या गोटात स्थिरावले आहेत. त्यामुळे नव्याने निवडून येणारे प्रतिनिधी पक्षाशी कितपत निष्ठावान राहतील, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी निवडणुकीच्या तोंडावर शेकाप पूर्णपणे बँकफुटवर गेल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत अपेक्षित असून, ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण जाहीर होणार आहे. यानंतर निवडणूक समीकरण अधिक स्पष्ट होईल. भाजपने मात्र आधीच जोरदार तयारी सुरू केली असून, तिकिटासाठी इच्छुकांची चढाओढ लागली आहे. शिंदे सेनेनेही आपल्या संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे.
जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मोर्चेबांधणीही सुरू आहे. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील आणि माजी नगरसेवक हरेश सक्रिय असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी इच्छुक उमेदवारांची यादी पक्ष नेतृत्वाकडे सादर केली आहे. मात्र तरीही शेवटच्या घटकाला उमेदवारी कुणाच्या पारड्यात पडणार याबाबत सर्व इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे.
कळंबोलीसह प्रभाग क्रमांक ८ हा शेकापचा परंपरागत बालेकिल्ला मानला जात असला, तरी या वेळी पक्षाची तयारी अत्यंत मंद आहे. सध्या शेकाप कार्यकर्ते दुबार मतदारांच्या तपासणीमध्ये गुंतले असल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांत झालेल्या पक्षफुटींमुळे संघटनाला मोठा फटका बसला आहे. माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर अनेक नगरसेवकांनीही त्यांचे अनुसरण केले.
२०१७ मध्ये निवडून आलेल्या शेकाप नगरसेवकांपैकी आता “केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच पक्षात उरले आहेत. त्यामुळे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेकापमध्ये आगामी निवडणुकीबाबत उत्साह दिसत नाही.
राज्यात नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. स्थानिक स्तरावरील ही निवडणूक असल्याने या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच शिवसेना-भाजपा व मित्र पक्षांची महायुती होणार की नाही? असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. कोकणातही असेच काहीसे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.






