पुणे : किरकोळ वादातून तिघांनी मिळून एकाला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेसमोरील परिसरात घडली. पोलिसांनी लागीलच एकाला अटक केली. तर त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. यश शाम आसवरे (२०, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, शकिल गुलाब शेख (४४, रा. कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार रणजित शिंदे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शकिलचा मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी धाव घेतली. तसेच, तपास सुरू केला. दरम्यान, शकिल हा मिळेल ते काम करायचा. त्याला दारूचे व्यवन होते. शुक्रवारी रात्रीच्या वेळी गाडगे महाराज शाळेसमोरील मैदानात शकिल थांबलेला होता. त्यावेळी यश व त्याचे साथीदार देखील त्या मैदानावर आले होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्यानंतर शकिल तेथील पडीक खोलीमध्ये पळाला.
पाठोपाठ आरोपींनी त्या खोलीमध्ये जावून त्याला मारहाण केली. मारहाणीत शकीलच्या छातीत, हनुवटीवर व डोक्यात मार लागला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी कोंढवा पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करत या खूनाचा काही तासात छडा लावत पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये दोन अल्पवयीन तरूणांचा समावेश आहे. कोंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Title: Murder of one person in kondhwa due to minor reason 3 persons in police custody nrdm