संघापासून अजितदादा चार हात दूर? तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले (Photo Credit- X)
मुंबई: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उदघाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार होता कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तसा उल्लेख होता. परंतू, या इमारतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव असल्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा जपल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर स्थापन झालेल्या भाजप शिवसेना सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले. पक्षाच्या विचारधारेशी कोणतीही तडजोड न करता विकासाच्या मुद्द्यावर महायुती सरकारमध्ये सामील झाल्याचे अजित पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. महायुतीमध्ये अजित पवार भाजपसोबत आहेत. भाजप नेत्यासोबत ते सरकारच्या शासकीय कार्यक्रमात ते उपस्थित राहतात मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार कधीच दिसत नाहीत, किंबहुना संघाशी संबंधीत कार्यक्रमाला देखील ते हजेरी लावत नाहीत हे मागील अडीच वर्षात अनेकदा दिसून आलेले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी संघ मुख्यालयात भेट दिली. एकनाथ शिंदे यांनी देखील त्यावेळी संघ मुख्यालयाला भेट दिली होती. मात्र अजित पवार हे देखील उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर देखील महायुतीच्या नेत्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती तेव्हा देखील अजित पवार यांनी संघ मुख्यालयात जाण्याचे टाळले.
सोमवारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीचे (डॉ. केशव ब. हेडगेवार भवन) उदघाटन झाले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर अजित पवार यांचे प्रमुख उपस्थिती म्हणून नाव होते. मात्र असे असताना देखील हेडगेवार यांचे नाव इमारतीला असल्यामुळे पक्षीय विचारधारेच्या भूमिकेतून त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले असल्याचे बोलले जात आहे, यामागे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुजन सर्वसमावेशक विचारधारेच्या भूमिकेशी ठाम राहण्याची भूमिका असल्याचे मानले जाते.
माघार नाहीच ! महायुतीतील दोन बड्या नेत्यात अखेर लढाई ठरली; अजित पवार अन् मुरलीधर मोहोळ भिडणार
राष्ट्रवादी काँग्रेससोबत दलित, बहुजन, अल्पसंख्यांक मतदार पक्ष स्थापनेपासून आहे. धर्म निरपेक्ष आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे. त्यामुळे अजित पवार भाजपसोबत सत्तेत असले तरी संघापासून चार हात दूर असतात.
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो बॅनरवर लावत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर आम्ही वाटचाल करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांनतर पुसेसावळी दंगल, पन्हाळा दंगलीनंतर अजित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली होती. अशा गोष्टीतून अजित पवार दलित-मुस्लिम समाजाला पक्षाच्या विचारधारेचा संदेश देत असतात. बेरजेचे राजकारण करायचे पण विचारधारेशी तडजोड करायची नाही अशी अजित पवार यांची भूमिका दिसते.
अजित पवार सत्तेत भाजपसोबत असले तरी संघापासून नेहमी दूर राहतात. पक्षाच्या विचारधारेत बहुजनवादाच्या भूमिकेला नेहमी वरचे स्थान ते देत असतात. भाजपसोबत सत्तेत जाऊन देखील आपल्या पक्षाच्या विचारधारेवर ठाम असणारे काही मोजके नेते आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार हे देखील भाजपसोबत सत्तेत असले तरी संघापासून दूर असतात. त्याच पद्धतीने अजित पवार देखील संघापासून दूर राहण्याची भूमिका घेतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.