फोटो सौजन्य AI
दिवाळीचा सण जवळ येताच घरापासून दूर राहणाऱ्या नागरिकांची गावी परतण्याची लगबग सुरू झाली आहे. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त पुणे, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये राहणारे अनेक जण कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी नागपूरला येण्याचे नियोजन करीत आहेत. मात्र, यंदा गावी परतण्याचा प्रवास चांगलाच महागला आहे. दिवाळीपूर्वीच विमान आणि खासगी बसच्या तिकीट दरांनी मोठी उसळी घेतली असून प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
ऑनलाईन बुकिंग संकेतस्थळांवर विमान प्रवासाचे भाडे ११ हजारांपासून १७ हजार ७९९ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर खासगी बसचे तिकीट दरही चार ते पाच हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने विमान कंपन्यांकडून मागणीनुसार तिकीट दर वाढवले जात असल्याचे चित्र आहे.
Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी
दिवाळीच्या काळात रेल्वे आणि विमानांची तिकिटे मिळणे कठीण होत असल्याने अनेक प्रवाशांनी आगाऊ बुकिंगला सुरुवात केली आहे. पुण्यासह अन्य शहरांतून नागपूरला येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक गाड्या हाउसफुल्ल झाल्याने प्रवाशांसमोर विमान किंवा खासगी बसने प्रवास करण्याचा पर्याय उरला आहे.
विविध विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर एकाच मार्गासाठी वेगवेगळे दर दिसत आहेत. काही कंपन्यांकडून क्रेडिट कार्डद्वारे सवलती दिल्या जात असल्या तरी वाढलेल्या मूळ भाड्यामुळे प्रवाशांना त्याचा फारसा फायदा होत नाही. पुणे ते नागपूर प्रवासासाठी काही प्रवाशांना १२ हजार रुपये, तर काहींना १४ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे.
Nagpur News : नागपूरकरांना दिलासा; तूर्तास पाणी कपात नाही; पाण्याची बचत आणि गळती रोखण्यावर मनपाचा भर
पुणे, मुंबई आणि हैदराबादहून नागपूरला येणाऱ्या विमानांचे भाडे तुलनेने अधिक आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास विमान कंपन्या तिकीट दरात वाढ करतात, तर मागणी कमी झाल्यास काही प्रमाणात दर घटतात. उपलब्ध ऑनलाईन दरांनुसार, ६ नोव्हेंबरला बंगळुरू-नागपूर विमान प्रवासासाठी १७ हजार ते १७ हजार ७९९ रुपये मोजावे लागत आहेत. दिल्ली-नागपूर मार्गावर हेच भाडे सुमारे ९ हजार १६९ ते १० हजार रुपये आहे. पुणे-नागपूर आणि मुंबई-नागपूर मार्गावरील तिकिटांचे दरही १४ हजारांच्या पुढे गेले आहेत.
दुसरीकडे, खासगी बस प्रवासही महागला आहे. पुणे-नागपूर मार्गावर ६ नोव्हेंबरला बसचे भाडे चार ते साडेचार हजार रुपये, तर ७ नोव्हेंबरला साडेचार ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. हैदराबाद-नागपूर मार्गावरही बसचे भाडे चार हजार रुपयांच्या पुढे गेले आहे.
एकंदरीत, दिवाळीला कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना यंदा प्रवासासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नसल्याने विमान आणि खासगी बसचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक गणित मात्र पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे.






