माणगाव (भारत गोरेगावकर) – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सर्व चाहत्यांचे सर मनोहर जोशी यांच्या दुखःद निधनाचे वृत्त त्यांचे जन्मगाव असलेल्या नांदवी गावात पोहचले आणि नांदवीसह परिसरावर शोककळा पसरली आपल्या लाडक्या सरांच्या आठवणींनी अनेकांना हुंदका लागला तर त्यांच्यासमवेत शालेय जीवन जगणाऱ्या वर्गमित्रांना अश्रू अनावरण झाले.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात अत्यंत छोटेशे असणारे नांदवी गाव जगाच्या नकाशावर आले ते मनोहर जोशी सरांमुळे. याच गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एका सदन कुटुंबात जन्मलेल्या सरांचे नांदवीमध्ये इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झाले. घरोघरी माधुकरी मागायची आणि उदरनिर्वाह करत शिक्षण घ्यायचे हि घरची परिस्थिती चौथी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना महाडला जावे लागले. तिथेही तोच दिनक्रम असायचा बदलत्या परिस्थितीनुसार बालपणीचा मामा सुधीर जोशी यांच्याकडे पनवेल येथे गेले. तिथे सकाळी दारोदार पेपर टाकायचे आणि शिक्षण घ्यायचा हा वसा त्यांनी सोडला नाही. पुढे मुंबई महापालिकेत नोकरी लागली आणि सरांनी नांदवी येथून आपला मुक्काम मुंबईत स्थिर केला.
शिक्षणाची आवड आणि अथक परिश्रम घेण्याची तयारी असणाऱ्या सरांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला आणि नांदवी सारख्या छोट्याशा खेडेगावात एकेकाळी माधुकरी मागून जीवन जगणारे सर नगरसेवक, महापौर, विरोधीपक्ष नेते, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री ते थेट लोकसभेचे अध्यक्ष बनले. परंतु ते कधीच जन्मभूमीला विसरले नाही. प्रत्येक पदावर असताना त्यांनी आपल्या नांदवी गावाला भेट देऊन आपुलकी कायम जपली होती. इतकेच काय तर बाळासाहेबांच्या हस्ते नांदवीतील दत्त मंदिराचे भूमिपूजन देखील खास ग्रामस्थांच्या आग्रहाखातर केले होते. सर कधी गावाला विसरले नाही म्हणून गाव आजही सरांना विसरलेलं नाही मात्र त्यांच्या निधनाने एक अतूट नातं आज निखळलं आहे.
सर आणि मी एकाच वर्गात शिकत होतो. त्यावेळेस कबड्डी हा सरांचा आवडता विषय त्यांच्यासोबत मी अनेकदा माधुकरी मागायला जात असे ही ओळख ते कधीच विसरले नाही. कुठल्याही पदावर ते असुदेत पण नांदवीत आले की पहिला निरोप पाठवायचे त्या महादेवला बोलवा मला खुप बरे वाटायचे. मी भेटलो की ‘काय महादेव कसा आहेस? पोपटीच्या शेंगा खायच्या आहेत घेऊन ये…. हे अधिकार वाणितले शब्द आता कानावर येणार नाहीत याचे दुखः आहे. हे बोलताना सरांचे वर्गमित्र महादेव देवघर यांना अश्रु अनावर झाले.
सर नसते तर आज नांदवी हे नाव देखील कुणाला माहित झाले नसते. ज्या गावात चक्क भिक्षा मागून खायची वेळ आली होती. त्या गावाला मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष सारखं उच्च पद मिळाल्या नंतरही ते कधीच विसरले नाहीत. याउलट या गावाची भरभराट कशी होईल इथला सामाजिक सलोखा टिकून कसा राहील यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. गावातील शिक्षण पध्दतीत सुधार केला म्हणूनच आज मुलं माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेत आहेत असा नांदवीचा कोहिनूर हरपला हे सांगताना माजी सरपंच विलास म्हसकर यांचा कंठ दाटून आला.
सरांच्या कृपेने गावाला नाव प्राप्त झाले. कुठेही गेलो आणि नांदवी येथून आलोय असे सांगितले. तर लगेच लोकं विचारतात सरांचे गाववाले का? अशी ओळख केवळ सरां मुळेच मिळाली. त्यांच्या मुळेच आम्हाला शिवसेनाप्रमुखांना जवळून पहाता आले. काही झाले तरीही निष्ठा सोडायची नाही अशी तंबी कायम देणारे सर आता परत दिसणार नाही हे मनाला अस्वस्थ करते अशी भावना राजेश म्हाप्रलकर यांनी व्यक्त केली.