"तुम्ही मुख्यमंत्री असताना लोकांनीच तुम्हाला गेट आऊट...", नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्या कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारकडून जोडो मारु आंदोलन करण्यात आले. यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारकडून नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. विशेषत: भाजप खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “संजय राऊत यांनी जातीय वातावरण भडकवण्याचे काम केले आहे. राज्य सरकारने त्यांना अटक करावी,” असा आरोप त्यांनी केला आणि अटकेची मागणी केली. तसेच यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका केली.
“शांततेचा एखादा मोर्चा का काढत नाहीत की शांत राहा, एखादा मोर्चा काढा, पुतळा पडला त्यापेक्षा चांगला देखणा पुतळा आपण तयार करुयात. बोलला असतात तर तुमची कीर्ती वाढली असती. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतही तुम्ही राजकारण करत आहात. वय वर्षे 83 पर्यंत तुम्ही स्वत:च्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत”, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली.
भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर काही क्षणातच पडलेल्या भागावर कापड टाकण्यात आले होते. पण त्यांनी ते कापड बाजूला काढून त्याचे फोटो काढून वायरल करण्याचे काम त्यांनी केले आहे. लोकांना भडकावण्याचे काम त्यांनी केले आहे. महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचे काम करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर त्वरित कारवाई करत केली पाहिजे. त्यांना तत्काळ अटक करायला पहिले.” अशी मागणी केली. ‘निवडणुका आहेत म्हणून कसेही नाचाल?’ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
“उद्धव ठाकरे यांनी कधीही कोणाच्या कानाखालीदेखील लगावली नाही. उद्धव ठाकरे ‘गेट आऊट’ करण्याची धमकी देतात. तुम्ही काय गेट आऊट करणार, मुख्यमंत्री असताना लोकांनीच तुम्हाला गेट आऊट केले.” असा टोला खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
“तुला सत्ता कशी मिळणार? तुमच्या हातात अर्धे वर्ष असताना तुम्ही काय केले? तुमची सत्ता कशी येईल? तुम्ही कधीच मुख्यमंत्री होणार नाही. उद्धव ठाकरे यांनाही माहिती नाही. “उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्राला 10 वर्ष मागे गेली.” अशी टिप्पणी त्यांनी केली. “बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी होते, पण हा माणूस स्वार्थी आहे. आज उद्धव ठाकरे काँग्रेससोबत आहेत. राहुल गांधीनी माफीवीर असे म्हणून स्वातंत्रवीर सावरकांना हिणवले होते. तेव्हा उद्धव ठाकरे मुग गिळून गप बसले होते. मी त्यांचा सामना वाचत नाही, पण आज हातात घेतला आणि वाचला. जी भाषा वापरली ती आपल्या भाषेचा नावलौकीक वाढवणारी आहे का? हा माझा प्रश्न आहे,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.