ठाणे आणि नवी मुंबई स्थानकांतील पावसाळापूर्व कामे तातडीने मार्गी लावा
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील पुनर्विकासाचे काम, पावसाळापूर्व विकासकामे, सिडको येथील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी आज बुधवारी रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या.
ठाणे आणि मध्य रेल्वे अंतर्गत येणारे रेल्वे स्टेशन्स, रेल्वे समस्या, उपाययोजना, रेल्वेची प्रगती, रेल्वेची यापुढे होणारी कामे आणि चालू स्थितीतील कामे या विषयी चर्चा करण्याकरता मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे खासदारांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला खासदार नरेश म्हस्के यांच्यासह धर्मवीर मीना उपस्थित होते.
ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आरएलडीएने लवकरात लवकर करावा. ठाणे रेल्वे स्थानकावरील चालू छताचे काम पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे. जेणेकरून पावसाळ्यात प्रवाशांना त्रास होणार नाही. तसेच पावसाळ्यात पुराची समस्या टाळण्यासाठी ड्रेनेजचे काम आणि प्लॅटफॉर्मची स्वच्छता देखील करावी. ठाणे रेल्वे स्टेशनवर मुंबईच्या दिशेने आणखी एक एफओबी जो प्लॅटफॉर्म 1 ते 7/8 ला जोडेल आणि पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रदान करेल असा तयार करावा. ठाणे रेल्वे स्थानकावरील अर्धवट तुटलेल्या एफओबीची पुनर्बांधणी लवकरात लवकर करावी. (प्लॅटफॉर्म क्रमांक – 5 ते 10अ) अशा मागण्यांचा समावेश करून रेल्वे स्टेशनमधील रहिवासी (बांदल चाळ) आणि आजूबाजूच्या घरांमध्ये (बी केबिन) सुमारे 59 वर्षांपासून राहत आहेत, त्यांना रेल्वेकडून एक नोटीस मिळाली आहे ज्यामध्ये रेल्वे प्रशासनाने 5 मे 2025 रोजी मध्य रेल्वेच्या विभागीय अभियंता कार्यालयाला चर्चेसाठी बोलावले आहे. या विषयासंदर्भात मानवतेच्या दृष्टीकोनातून आमच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये असे खासदार नरेश म्हस्के बैठकीत सांगितले.
रेल्वे संदर्भात निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे गरजेचे आहे तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे आणि त्याकरिता रेल्वेतर्फे प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघातील स्टेशन निहाय अधिकारी नेमण्याचा निर्णय घेण्यात यावा जेणे करून प्रवाशांचे प्रश्न मार्गी लागतील असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
नवी मुंबई परिसरातील रेल्वे स्टेशन सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्या असमन्वयामुळे विकास थांबलेला आहे. या संदर्भातही चर्चा करण्यात येऊन लवकरात लवकर सिडको आणि रेल्वे यांच्यामध्ये समन्वय साधून संबंधित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्याचा आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.