देवेंद्र फडणवीस (यूट्यूब चॅनेल)
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यास महिलांच्या खात्यात १,५०० रूपये जमा होणार आहेत. दरम्यान महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आतापर्यंत जवळपास सव्वा कोटींच्या आसपास महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आज नाशिक येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पेसा कायदा, लाडकी बहीण योजना यावर भाष्य केले. तसेच बदलापूर घटनेवर सुप्रिया सुळे यांनी माझी सुरक्षा काढून मुलींना सुरक्षा द्यावी असे संतप्त प्रतिक्रिया दिली होती. यावर फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
आज नाशिक येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे तसेच इतर नेते उपस्थित होते. बदलापूर यथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. सरकारने याबाबत कारवाई सुरू केली आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला होता. गृहमंत्र्यानी राजीनामा द्यावा. तसेच माझी सुरक्षा त्वरित काढून घ्यावी आणि मुलींना द्यावी अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या काळातील मुद्द्यावरून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नाशिकमधील मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”बदलापूर घटनेवरून आणि इतर प्रकरणावरून वेगवेगळ्या प्रकारची विधाने पाहायला मिळत आहे. आता आमच्या ताई म्हणाल्या माझी सुरक्षा काढून घ्या आणि मुलींना सुरक्षा द्या. माझा त्यांना सवाल आहे, मागच्या काळात यांचे सरकार असताना निर्भया पथकाच्या गाड्या यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरल्या. यावेळेस त्यांना महिलांची सुरक्षितता आठवली नाही. या गाड्या निर्भया पथकाच्या होत्या, महिला सुरक्षेच्या होत्या. त्या गाड्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये ताई तुमच्या सुरक्षेत लागल्या होत्या, त्याचा तुम्ही कधी विचार केला नाही.”