हरवलेल्या लेकाचा जंगलात सापडला सांगाडा (Photo Credit- AI)
सरपण गोळा करताना उघड झाला प्रकार
शनिवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास शंकर नगर परिसरात एक दाम्पत्य सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. नाल्यालगतच्या दाट झाडीत आणि गवताआड त्यांना लहान मुलाचे हाडांचे अवशेष आणि कपडे दिसले. त्यांनी तातडीने सिन्नर पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, सहाय्यक निरीक्षक रूपाली चव्हाण आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
आईने ओळखले लेकाचे कपडे; घटनास्थळीच फोडला हंबरडा
१५ ऑक्टोबर २०२५ रोजी गणेश नगर भागातून जितेंद्र गुड्डू कुमार सिंग (वय ५) हा मुलगा बेपत्ता झाला होता. पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते. घटनास्थळी मिळालेले कपडे आणि चप्पल पाहून जितेंद्रची आई रेश्मा सिंग यांनी हंबरडा फोडला. हा सांगाडा आपल्याच मुलाचा असल्याची ओळख त्यांनी पटवली. मात्र, तांत्रिक खात्रीसाठी पोलिसांनी आईचे रक्ताचे नमुने डीएनए (DNA) चाचणीसाठी घेतले आहेत.
हिंस्र श्वापदाचा हल्ला की घातपात?
जितेंद्र बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश, मुंबई आणि शिर्डीपर्यंत तपास चक्रे फिरवली होती. प्राथमिक अंदाजानुसार, या बालकाचा मृत्यू एखाद्या हिंस्र श्वापदाच्या हल्ल्यात झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
तपासासाठी फॉरेन्सिक टीम पाचारण
घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिकहून फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन ठोंबरे यांच्या उपस्थितीत पंचनामा करून सर्व अवशेष तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.






