'दिल्लीतही जाऊ देत नाहीत अनं इथेही राहू दिलं जात नाही'; भुजबळांची घुसमट नक्की कोणामुळे?
मंत्रिमंडळातून डावलल्यापासून छगन भुजबळ कमालीचे नाराज आहे. त्यांच्या नाराजीची रोज नवीन माहिती, रोज नवीन विधान समोर येत आहेत. त्यातच आज भुजबळांनी पुन्हा मोठं विधान केलं आहे. आधी दिल्लीत जायचं होतं, तेव्हा सांगितलं की राज्यात गरज आहे, राज्यात लढा, पण येथेही डावललं गेलं असं म्हणत पुन्हा एकदा आमदार छगन भुजबळ यांनी पक्षाप्रती नाराजी व्यक्त केलीय. मंत्रिमंडाळात स्थान न देण्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचा शंका असल्याचंही भुजबळ म्हणालेत. मंत्रिमंडळात डच्चू मिळाल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांनी आपल्या पक्षातील नेत्यांविरोधात दंड थोपटण्यास सुरुवात केलीय.
आपल्या मतदारसंघात जाऊन ओबीसी कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांना काय वाटतं? आपण काय निर्णय घ्यावा हे मत जाणून घेत आहेत. दरम्यान भुजबळ हे काही मोठा निर्णय घेऊ शकतात असा अंदाज जाणकर वर्तवत आहेत. याच पार्श्वभुमीवर छगन भुजबळ यांनी नाशिक मध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शेंडगे राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. मंत्रिमंडळात बिनकामाचे नेते घेतले आणि कामाचा नेता बाहेर ठेवला असा टोला त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला लगावला.
छगन भुजबळ यांनीही पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वावर टीका केलीय. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे राष्ट्रवादी आमदार छगन भुजबळ हे नाराज आहेत. ते काहीतरी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ते राज्यातील नेत्यांशी चर्चा करत पुढील निर्णय घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी बैठकांची धडाका लावलाय.
निर्णयामुळे आम्ही त्रस्त आहोत. काहीतही गौडबंगाल आहे, असं मत ओबीसी नेत्यांनी मांडलंय. पुढील निर्णय घेण्यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू आहे. माझा वापर करू घेतला जातोय का नाही हे माहिती नाही. मात्र आपण दिल्लीत जात होतो तर राज्यात तुमची गरज आहे, येथे लढा असं सांगितलं पण आता मंत्रिमंडळातही स्थान दिलं नसल्याची टीका भुजबळ यांनी केलीय.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे प्रथमच आपल्या सिन्नर मतदारसंघात आले होते. त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत देखील केले. तसेच माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी भुजबळांनी पंतप्रधान व्हावे असे म्हणत टोला लगावला आहे.
नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय भाष्य केले. भुजबळ यांना अजित पवार यांनी राज्यसभेचा शब्द दिला होता, तो पूर्ण केला नाही असे भुजबळ बोलले असल्याचे पत्रकार म्हणाले. यावर माणिकराव कोकाटे म्हणाले, “शब्द पूर्ण होईल ना. सरकार स्थापन होऊत आतातरी चार दिवस झाले आहेत. राज्यसभा कुठे पळून चालली आहे. दम तर काढला पाहिजे ना.” असा टोला माणिकराव कोकाटे यांनी लगावला.