पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shivaji Jayanti 2023) राज्य शासनाच्या वतीने शिवनेरीवर (Shivneri Fort) साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरी येथे 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यावर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चेही आयोजन करण्यात आले आहे. पण या शिवजयंती सोहळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे.
किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज असावा याची जाणीव करून देण्यासाठी भगवं जाणीव आंदोलन! शिवजयंती साजरी करणारच, पण शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार!@AmitShah @mieknathshinde @Dev_Fadnavis @NCPspeaks @collectorpune1 @ChDadaPatil pic.twitter.com/5GuI76YrY7
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 16, 2023
शिवजयंती सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पण स्वराज्यरक्षक फेम खासदार डॉ. कोल्हे यांना देखील शासनाने या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. मात्र, त्यांनी शासनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यावर ते म्हणाले, ‘शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमाची पत्रिका मला मिळाली आहे. त्यासाठी सरकारचे आभार मानतो. मी शिवजयंती साजरी करणारच आहे. शिवभक्तांसाठी हा मोठा सण आहे. मात्र त्यात बरोबर शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेकांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर खासदार म्हणून मी बहिष्कार टाकणार आहे’.
भगवा ही आमची अस्मिता
भगवा ही आमची अस्मिता आहे आणि शिवभक्तांचा फार मोठा गर्व आहे. या सगळ्यांचा आदर करुन महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका घ्यावी. मात्र, या दृष्टीने ठोस पावलं उचचली जात नाहीत. भगवा ध्वज नसल्याची जाणीव करुन देण्यासाठी मी शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याची मागणी
बरीच वर्ष झाली मात्र अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर अजूनही कायमस्वरुपी भगवा ध्वज नाही. 2021 पासून अनेक मंत्र्यांना आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून मी किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याची मागणी करत आहे. संसदेत देखील हा मुद्दा किंवा ही मागणी मी केली आहे, असे कोल्हे म्हणाले.