File Photo : Supriya Sule
मुंबई : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ (Crime Rate Increases) होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. त्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत. एवढं सगळं होतंय हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा (Home Minister) राजीनामा द्यावा. हे माझं वैयक्तिक मत आहे, असे त्या म्हणाल्या.
कोल्हापुरात कर्जाची परतफेड करत नसल्याने सावकर गुंडांच्या माध्यमातून कुटुंबाला मारहाण करत धमकावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जाची परतफेड न केल्यास कर्ज घेणाऱ्या कुटुंबातील महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडू असं सावकाराने धमकावलं आहे. दुसरीकडे पोलीस तक्रार करुनही घटनेची दखल घेत नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.
हे गृहमंत्रालयाचे अपयश
‘राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत. दौंडमधील गुन्हेगारी, खून, पुण्यातील कोयता गँग, महिलांवर अत्याचार हे सातत्याने राज्यात होत आहे. राज्यात एवढं सगळं होतंय हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, असेही त्या म्हणाल्या.
दिव्यांगांना काहीच मदत केली जात नाही
दिव्यांग बांधवाना एडीआयपी योजनेंतर्गत आणि वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने गेले अनेक महिने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना काहीच मदत केली जात नाही, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.