16 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra rain live update : मुंबई : राज्यामध्ये पावसाने तुफान बॅंटिग सुरु केली आहे. आज सकाळपासून जोरदार वरुणराजाने बरसायला सुरु केली असून मुंबईसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पुणे आणि मुंबईसह 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागिरकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जनजीवन विस्कळीत होत असल्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलर्टमोडवर आली आहे. या परिस्थितीमुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शरद पवार गटाकडून केली जात आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसानंतर शहराची पूर्ण व्यवस्था बिघडल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, “राज्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागामध्ये पंचनामे देखील झालेले नाहीत. ज्या ठिकाणी पंचनामे झाले आहे त्या ठिकाणी मदत पोहचलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन एकेरी 50 हजार रुपयांची मदत करावी,” अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य सरकारकडून निवडणुकांपूर्वी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणत्याही स्वरुपाची कर्जमाफी देण्यात आलेली नाही. यावर देखील शशिकांत शिंदे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “महायुती सरकारची घोषणाच कर्जमाफीची होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत वेळ आली तर कर्जमाफी करू, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट कर्जमाफी करता येत नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे, जर सरकारने लवकरच सरसकट कर्जमाफीची घोषणा केली नाही तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारू,” असा कडक इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईमध्ये जोरदार पाऊस
मुंबईमध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळी सहा वाजेपूर्वीच्या 48 तासांत जवळपास 200 एमएम पाऊस पडला. आणि आज सकाळपासून सहा ते आठ तासांत तब्बल 170 एमएम पाऊस पडला आहे. म्हणजेच मुंबईत प्रचंड पाऊस पडला आहे. यामुळे मुंबईमधील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले आहे. रस्त्यांवर पाणी साचले असून गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील पाण्यामध्ये अडकले आहेत. मुंबईतील लोकल व्यवस्थेवर परिणाम झाला असून रेल्वे रुळावर देखील पाणी साचले आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.