नितीन गडकरी यांची अकलुज मध्ये प्रचारसभा (फोटो- ट्विटर)
अकलूज: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारसभा घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री आणि खासदार नितीन गडकरी यांनी अकलुजमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली आहे. यावेळी त्यांनी संविधान बदलाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहेत. नितीन गडकरी यांनी राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. नितीन गडकरी यावेळेस नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
“अलाहाबाद कोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणुक रद्द ठरवल्यानंतर काँग्रेसने १९७५ साली संविधान बदलण्याचे पाप केले, आता त्यांचा नातू भाजपावर संविधान बदलणार असल्याचा आरोप करतो आहे. संविधान तर तुम्ही बदलले. काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला आणि निवडणुका जिंकल्या परंतु त्यांनी आदिवासी, दलित आणि गरीबांची गरीबी न हटवता आपल्या सत्तेचा दुरूपयोग करून स्वतःच्या बगलबच्चांची गरीबी हटवली. त्यामुळेच भारताची प्रगती होऊ शकली नसल्याचा घणाघाती आरोप,” केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
हेही वाचा: “तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घटना…”; इचलकरंजीतून नितीन गडकरींचे विधान
खेडी शहराला जोडण्याचे काम
केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले, काँग्रेस जे गत ६० वर्षात करू शकली नाही ते आम्ही पक्त १० वर्षात केले. देशाला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर व संरक्षण क्षेत्रात खंबीर केले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राबवून संपुर्ण देशातील खेडी शहराला जोडण्याचे काम केले. येणाऱ्या काळात गावे समृध्द आणि संपन्न करण्याची योजना पक्त भाजपाचे सरकारच राबवू शकते.
पाणी उपसा सिंचन योजनांना निधी
केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले, या भागातील टेंभू आणि म्हैसाळ या पाणी उपसा सिंचन योजनांना मी निधी दिल्यानेच या योजना सुरू झाल्या आहेत. या देशातील शेतकरी अन्नदात्या बरोबरच इंधनदाता कसा होईल, या दृष्टीने केंद्रीय सरकार पावले उचलत आहे. तरूणांची बेरोजगारी घालवून त्यांच्या हाताला काम देण्यासाठी विविध योजना आखत आहे. सिंचनाला प्राधान्य दिले जात असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.
📍अकलुज, माळशिरस, सोलापूर
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार श्री @RamVSatpute जी यांच्या प्रचारार्थ अकलुज, सोलापूर येथे आयोजित जाहीर सभेला आज संबोधित केले. सोलापूर ही संतांची भूमी आहे. मागील १० वर्षांत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी तीन पटीने वाढली… pic.twitter.com/QpQfi0S1RL
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 16, 2024
मंत्री गडकरी म्हणाले, उद्योग आणि व्यापारात खऱ्या अर्थाने प्रगती करायची असल्यास मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. जोपर्यंत या सुविधा निर्माण होत नाहीत तोपर्यंत कोणत्याच भागाचा विकास होणार नाही. पाणी, वीज, दळणवळण यामध्ये देशाची प्रगती होत आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर देशातील ७० टक्के नॅशनल हायवेचे काम पुर्ण झाले आहे. आता राज्य अंतर्गत रस्ते आणि उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. जोपर्यंत विकासाला गती मिळत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य कष्टकऱ्यांची प्रगती होणार नाही.