इचलकरंजीत नितीन गडकरी यांची प्रचार सभा (फोटो- ट्विटर)
इचलकरंजी: मागील ६० वर्षाच्या काळात देशात काँग्रेसने अनेक चुकीची धोरणे स्विकारल्यामुळे देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. किंबहुना प्रगती होऊ शकली नाही. परिणामी ग्रामीण भागातील लोकांना रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात शहरी भागात जावे लागले. हे चित्र बदलण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन पॉलिसी तयार केली असून भविष्यात ग्रामीण भाग पुर्णत: बदललेला दिसेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. शहापूर-इचलकरंजी येथील सभेत ते बोलत होते. सभेस कर्नाटकच्या आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने आदी उपस्थित होते.
मंत्री गडकरी म्हणाले, उद्योग आणि व्यापारात खऱ्या अर्थाने प्रगती करायची असल्यास मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. जोपर्यंत या सुविधा निर्माण होत नाहीत तोपर्यंत कोणत्याच भागाचा विकास होणार नाही. पाणी, वीज, दळणवळण यामध्ये देशाची प्रगती होत आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर देशातील ७० टक्के नॅशनल हायवेचे काम पुर्ण झाले आहे. आता राज्य अंतर्गत रस्ते आणि उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. जोपर्यंत विकासाला गती मिळत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य कष्टकऱ्यांची प्रगती होणार नाही.
देशातील शेतकरी हा केंद्रबिंदू मानून केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीचे बंधन घालण्यात आले. आता येत्या काही दिवसात देशातील काही राज्यात इथेनॉलचे ४०० पंप सुरु करणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी सिंचन आणि गावजोड याला प्राधान्य दिले नाही. त्यामुळे देशाचा विकास होऊ शकला नाही. ग्रामीण भागातील रस्ते मजबुत झाल्याशिवाय देशाची जीडीपी वाढू शकत नाही. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे ६० वर्षात देशाचा विकास खुंटला असल्याचेही ते म्हणाले. पाण्याच्या टंचाईमुळे विदर्भात आजपर्यंत १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली आहे.
इचलकरंजीत तयार होणाऱ्या गारमेंटच्या कात्रणावर नागपूरात १५०० महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. टाकावू मालापासून हजारो रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या टेक्स्टाईल सीटीला भविष्यात अनेक सोयी सवलती केंद्र सरकारच्या माध्यमातून देणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले. शिक्षण आणि ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने केल्यास प्रत्येक नागरीकाचे जीवन बदलल्याशिवाय रहात नाही, आणि हे घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने सुरु झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: कोल्हापूरच्या इचलकरंजी मतदारसंघात 268 मतदान केंद्रे; मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप सुरू
हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा चिमटा काढला. राहुल आवाडे हे माझे वर्गमित्र आहेत. मी खासदार झालो. मात्र त्यांना अद्याप ही संधी मिळाली नाही. आमदार आवाडे यांनी खुर्ची न सोडल्यामुळेच राहुल यांना आमदार होता आले नाही. आता ते आमदार होणार आहेत. त्यामुळे प्रकाश आवाडे यांनी भविष्यात लोकसभेला आम्हाला अडचण करु नये, हे मंत्री गडकरी यांच्यासमोरच कबुल करुन घेतो, असे सांगितले.
इचलकरंजी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर आहे. आधुनिक रस्ते-पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, उद्योग या सर्वच क्षेत्रांमध्ये गेल्या १० वर्षांत कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी झाली आहे. विकासाची कास धरून… pic.twitter.com/jMx4Q0BT2y
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 14, 2024
भाजपतील घराणेशाहीला मुक संमती
भारत ही जगातील आर्थिक महाशक्ती झाली पाहिजे, हे स्वप्न पाहिले जात असताना देशात जातीयवाद पसरवून काही पक्षांनी राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न चालविला आहे. देशाचे भवितव्य बदलण्यासाठी स्वच्छ प्रतिमेचे नेते आणि पक्षाची गरज असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले. घराणेशाहीच्या मुद्यावर बोलताना मंत्री गडकरी यांनी कोणाचा मुलगा राजकारणात येत असल्यास तो गुन्हा नाही. जनतेचा उमेदवार हा राजकीय घराण्याच्या व्याख्येत येत असल्याने सांगून त्यांनी भाजपतील घराणेशाहीला मुक संमती दिली.
इंदिरा गांधींनी घटना बदलण्याचा प्रयत्न केला
विरोधकांनी संविधान बदलण्याचा खोटा प्रचार केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसला. मात्र देशात आणीबाणी लादली त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घटना बदलण्याचा प्रयत्न केला होता. सध्या मुस्लिमांना भिती घालण्याचे काम काँग्रेस पक्षाने चालले आहे. या अपप्रचाराला बळी न पडता देशाचे आणि राज्याचे भवितव्य बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याचे आवाहन, मंत्री गडकरी यांनी यावेळी केले.