मुंबई- भारतरत्न, महामानव तथा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar Jayanti) यांची आज 132 वी जयंती मोठ्या उत्साहात राज्यासह देशभर साजरी होत आहे. जयंतीनिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच बाबासाहेबांना देशभरातून अभिवादन करण्यात त्यांचे अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी (chaityabhoomi) येथे दाखल झाले आहेत. चैत्यभूमी परिसरात मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) सुशोभीकरण, सुरक्षा यंत्रणा, खास दालन आणि अनुयायांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळं पालिका देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सज्ज झाली आहे.
चैत्यभूमी परिसरात सुशोभीकरण…
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने आज (दि. १४ एप्रिल २०२३) रोजी चैत्यभूमीवर अनुयायांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते. याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध नागरी सेवा – सुविधा पुरविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. प्रामुख्याने चैत्यभूमी परिसरासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या ‘राजगृह’ याठिकाणी आणि इतर महत्वाच्या ठिकाणी विविध सेवा सुविधा देण्यात येणार आहेत. चैत्यभूमीसह विविध ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा – सुविधांबाबत वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री इकबाल सिंह चहल आणि महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री आशीष शर्मा यांनी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच अनुयायांसाठी सर्व तयारी प्रशासनाकडून करून देण्यात आली आहे.
अनुयायांसाठी सुयोग्य व्यवस्था
यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमी परिसरात पाच एलईडी स्क्रिनद्वारे चैत्यभूमीच्या आतील अभिवादनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासोबतच आरोग्य सुविधा, क्लोज सर्कीट टिव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी आणि अग्निशमन व नियंत्रण कक्ष सेवा आदींचा या सुविधांमध्ये समावेश आहे. महानगरपालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त रमाकांत बिरादार आणि जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
डॉ. बाबासाहेबांच्या जीवनपटावर आधारीत लेजर शो व छायाचित्रांचे प्रदर्शन
यंदा पहिल्यांदाच अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आयोजित एका विशेष लेजर शोचे आयोजन माता रमाबाई व्ह्युईंग डेक येथे करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे एक हजार कर्मचारी कार्यतत्पर असणार आहेत.
चैत्यभूमी परिसरात सुशोभिकरणाची कामे :
चैत्यभूमी परिसरातील स्तूपासह सभोवतालच्या रेलिंगला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्तूपाची सजावट ही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच चैत्यभूमी येथील तोरणा गेटची रंगरंगोटीही करण्यात आली आहे. चैत्यभूमी परिसरातील अशोक स्तंभाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणही करण्यात आले आहे. त्याचबरोबर याच ठिकाणी असणाऱ्या भीमज्योतीला सुंदर पद्धतीने फुलांची सजावट करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती व्हिवींग डेकलाही सजवण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन सोहळ्यादरम्यान महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीतर्फे गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलीस दलाच्या बॅंड पथकाद्वारे मानवंदनाही देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दादर स्थानक ते चैत्यभूमी परिसरात दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यासाठी चैत्यभूमी परिसरात आणि इतर महत्वाच्या ठिकाणी सर्मपित वैद्यकीय कक्ष अनुयायांच्या सेवेत कार्यरत असणार आहेत. याठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मंडळी व कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारीही पुरेशा संख्यने सेवेसाठी सज्ज असणार आहेत. याठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका सदैव तैनात असणार आहेत. याव्यतिरिक्त सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मुखपट्टी (मास्क) आणि सॅनिटायजर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम रूग्णालयामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजनही चैत्यभूमी परिसरात करण्यात आले आहे, अशी माहिती जी उत्तर विभाग कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सेवासुविधांबाबत संक्षिप्त आकडेवारी पुढीलप्रमाणे :
आरोग्य तपासणी कक्ष
वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी १६
थेट प्रक्षेपणासाठी पाच एलईडी स्क्रिनचा वापर
समाजमाध्यमांवर लाईव्ह प्रक्षेपण
अनुयायांसाठी मिनरल वॉटर
पिण्याच्या पाण्याची टॅंकरद्वारे २४ तास व्यवस्था
फिरते शौचालये – १०
अग्निशमन दलाचे १ इंजिन आणि टॅंकर तैनात
सीसीटीव्हीची यंत्रणा
स्पीडबोटची व्यवस्था
स्वच्छतेसाठी अविरत कामगार
स्वयंसेवी संस्था स्वच्छतेसाठी मदत करणार
महानगरपालिकेचे १ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यतत्पर राहणार