धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू (संग्रहित फोटो)
अकोला : एका घराचा स्लॅब टाकण्यात आल्यावर सिमेंट काँक्रेटचे मिक्सर बाहेर काढताना अपघात झाला. यामध्ये 14 मजुरांना विजेचा जोरदार धक्का बसल्याची घटना जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात घडली. या दुर्दैवी घटनेमध्ये एका अल्पवयीन मजुराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या वडगाव रोठे गाव येथील रहिवासी वसंता बरिंगे यांच्या घरी स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले. बांधकाम आटोपल्यानंतर सिमेंट काँक्रेटचे मिक्सर काढले जात होते. त्यावेळी अचानक विजेचा प्रवाह त्यामध्ये आला.
दरम्यान, या मिक्सरला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यामध्ये विजेचा प्रवाह आला. त्यामुळे मिक्सरला स्पर्श केलेल्या सर्व १४ मजुरांना विजेचा जबरदस्त झटका बसला. एका अल्पवयीन मजुराचा मृत्यू झाला.
सात-आठ जण जखमी
ओम प्रकाश केशवराव जांभळे (१७) असे मृत बांधकाम कामगार मुलाचे नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. विजेचा धक्का बसलेल्या मजुरांपैकी सात ते आठ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर तेल्हाराच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या धक्कादायक व दुर्दैवी घटनेनंतर संबंधित बांधकाम ठेकेदार घटनास्थळावरून पसार झाला. तेल्हारा पोलिस त्याचा शोध घेत आहे.
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आला ऐरणीवर
बांधकाम कामगार आपल्या जीवावर उदार होऊन काम करत असतात. या कामगारांना पुरेशा सुरक्षा साधनांचा पुरवठा संबंधित ठेकेदाराकडून केला जात नाही. त्यामुळे दुर्घटना होऊन कामगारांना जीव देखील गमवावा लागतो. याच प्रकारची घटना तेल्हारा तालुक्यात घडली. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, शेतातील कपाशीच्या पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी थेट कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडला होता. पण यामुळे शेतात जागलीला असलेल्या शेतकरी दाम्पत्यालाच जीव गमवावा लागला. विजेचा धक्का लागून दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाचप्रकारची घटना समोर आली आहे.