ओव्हरलोड ट्रकची चार वाहनांना जोरदार धडक; टोलनाका चुकवण्याच्या प्रयत्नात घडलं सारं काही... (संग्रहित फोटो)
गोंदिया : टोलनाका चुकवण्याच्या प्रयत्नात ओव्हरलोड ट्रकचालकाने चक्क विरुद्ध दिशेने वाहन आणले. अशातच धडाधड रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ४ वाहनांना धडक दिली. त्यानंतर बसच्या प्रतीक्षेत उभे असलेल्या २० विद्यार्थ्यांनाही चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, समयसूचकता दाखवत विद्यार्थी बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चक्क रस्ता दुभाजकावर १० मीटरपर्यंत ट्रक गेला. हा थरार सालेकसा येथील बसस्थानकावर गुरुवारी (दि. १४) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला.
गुरुवारी विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची लगबग सुरू होती. विद्यार्थ्यांनी सालेकसा बसस्थानक गाठले. यावेळी सुमारे २० विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचप्रकारे चाकरमाने तसेच व्यापारी आणि शेतकरीदेखील गोंदिया आणि आमगावला जाण्यासाठी सकाळी साडेनऊच्या सुमारास उभे होते. अशातच दरेकसाच्या दिशेने आमगावकडे जाणारा ट्रक (एमएच-४०/वाय-५५९७) भरधाव आला. त्या ट्रकने धडाधड ४ वाहनांना धडक दिली. त्यानंतर उभे असलेले विद्यार्थी आणि प्रवाशांच्या दिशेने ट्रक आला. परिस्थितीचे भान राखूत विद्यार्थी आणि प्रवासी तेथून पळाले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
दरम्यान, ट्रकचालकाचा थरार एवढ्यावरच थांबला नाही, तर चालकाने ट्रक चक्क रस्ता दुभाजकावर चढविला. सुमारे १० मीटरपर्यंत ट्रक दुभाजकावरून चालत होते. हा सर्व प्रकार पाहून तेथे उपस्थित नागरिकांनी त्या ट्रकचालकाला थांबवून चांगलाच चोप दिला. पोलिसांना माहिती मिळताच चालकाला ताब्यात घेत ट्रक जप्त करण्यात आला.
जडवाहतूक बंदचे आदेश, तरी सर्रास वाहतूक
वाघ नदीवरील आमगाव ते सालेकसा मार्गावरील पूल जीर्ण झाला. या पुलावरील जड वाहतूक बंद केल्याचा आदेश जिल्हाधिका-यांनी काढला. हाईट बॅरेलदेखील बसविण्यात आले. मात्र टोल चुकविण्याच्या नादात जडवाहनचालक याच रस्त्याच अवलंब करतात. त्यामुळे नदी पुलावरील जडवाहतूक रोखण्यासाठी नेमलेले कर्मचारी करतात तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांकडून कारवाई कधी?
आमगाव आणि सालेकसा पोलिसांकडे जड आणि भरधाव वाहतूक रोखण्याची जबाबदारी आहे. मात्र, खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे वे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच रात्रदिवस या पुलावरून जडवाहतूक सुरू आहे गस्तीवरील आणि पॉइंटवर नेमलेले पोलिस बंदी असलेल्या वाहनचालकांवर कारवा का करीत नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे.