परभणीच्या येलदरी धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा; पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा (File Photo : Dam)
परभणी : राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात परभणीच्या येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येलदरी धरण ९५ टक्क्यांवर पोहोचले असून, पूर नियंत्रणासाठी १५ ऑगस्ट रोजी येलदरीतून वीज निर्मिती केंद्राच्या दोन जनित्रातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यानुसार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरत आले असून, पूर नियंत्रणासाठी १५ ऑगस्ट रोजी येलदरी धरणातून येथील वीज निर्मिती केंद्राच्या दोन जनित्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जलसंपदा विभागाच्या पूर्णा प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी एका परिपत्रकानुसार येलदरी धरणातून पूर नियंत्रणासाठी नदीपात्रात १८०० क्यूसेकने पाणी सोडावे लागणार असल्याचे कळवले आहे.
मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे येलदरी धरणाच्या वरच्या भागात असलेल्या खडकपुर्णा धरणातून १९ दरवाज्यापैकी ३ दरवाज्यांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे येलदरी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू झाली आहे. परिणामी, येलदरी धरण ९५ टक्के भरले आहे.
पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात
धरणाच्या पावसाळ्यातील पाणी साठवण करण्याच्या नियमानुसार व धरणात येणाऱ्या पाण्यामुळे धरणातून १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता येथील जलविद्युत केंद्राचे दोन युनिट सुरू करून त्यातून १८०० क्युसेक विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडला. त्यामुळे पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी नदी पात्रात असणाऱ्या विद्युत मोटारी, जनावरे व शेती उपयोगी साहित्य नदी पात्रापासून लांब ठेवावे, असे आवाहन येलदरी धरण प्रशासनाने केले आहे.