File Photo : Crops_Kolhapur
शाहुवाडी : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यात कोल्हापुरातील शाहुवाडी तालुक्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे भात पीक जोमात आले आहे. भात पिकामुळे संपूर्ण शिवार हिरवागार झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
हेदेखील वाचा : लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान
शाहुवाडी तालुक्याला विशेषतः तालुक्याच्या उत्तर भागाला भात पिकाचे आगार म्हणून संबोधले जाते. या परिसरात भात हा रोप लावण पध्दतीने केला जातो. मृग नक्षत्राच्या तोंडावर तरव्याची पेरणी करून जुलै महिन्यात रोप लावणीस प्रारंभ केला जातो. यावेळी पावसाने सुरुवातीपासूनच दमदार सुरुवात केली होती. अगदी शेतकरी वर्गाने पावसाला साद घालावी आणि पाऊस यावा. अशा पद्धतीने पाऊस लागल्यामुळे व विशेषतः आतापर्यंत पावसाची संततधार टिकून राहिल्याने भात पिकाच्या वाढीस नैसर्गिक पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे भात पिक तरारून आले.
यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी अमोघ, राजा, आर १, रत्ना ५ आदी बियाणांची पेरणी केली आहे. वारणा, काणसा आदी नद्यांना आलेल्या पुरामुळे या परिसरातील नदीकाठच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, माळरानावरील व उंचसखल भागात केलेली भात पिके चांगलीच तरारून आली असल्याचे समाधानकारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
यवतमाळमध्येही मुसळधार पाऊस
यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात मुसळधार पावसामुळे टाकळी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक बंद झाली होती. चाटवण, टाकळी, अर्जकवाकडा, सत्पल्ली, दाभा, दिग्रस, दुर्भा या गावातील व इतर गावातील शेती पाण्याखाली गेली आहे. कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.
हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने घेतले हिरावून
तर कोल्हापुरात पिकांना फायदा होत आहे. असे असताना यवतमाळमध्ये हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व जवळपास सर्वच लागवडीचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.