बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचे गोल रिंगण काटेवाडी (ता. बारामती) येथे मोठया उत्साहात पार पडले. ग्यानबा – तुकारामाच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या गजरात मेंढ्यानी पालखी भोवती गोल प्रदक्षिणा धावत केल्यानंतर वैष्णवांमध्ये मोठा उत्साह संचारला. काटेवाडीनंतर पालखी सोहळ्याचे (Ashadhi Wari 2022) आगमन इंदापूर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भवानीनगरमध्ये होताच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
बारामतीचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर तालुक्याच्या दिशेने आज (दि.२९) प्रस्थान ठेवले. बारामती शहरालगत असलेल्या मोतीबाग, बांदलवाडी येथून पिंपळी, लिमटेक या ठिकाणी पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीमध्ये पालखी सोहळ्याचे आगमन झाले.
यावेळी शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्यासह सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच श्रीधर घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य के.टी जाधव आदींसह इतर मान्यवरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. काटेवाडी येथील ननवरे परिवाराच्या वतीने पालखी विसावा स्थळापर्यंत धोतरांच्या पायघड्या टाकण्यात आल्या. यावेळी पालखी विसावा स्थळी दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यानंतर पालखी सोहळा भवानीनगर च्या दिशेने मार्गस्थ झाल्यानतर काटेवाडी बसस्थानकाजवळ सायंकाळी साडेतीनच्या सुमारास मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडले.
काटेवाडी येथील महादेव काळे, विकास केसकर, जालिंदर महानवर, सुभाष मासाळ या शेतकऱ्यांच्या या मेंढ्या होत्या. यानंतर साडेचार वाजता पालखी सोहळ्याचे भवानीनगर या ठिकाणी आगमन होताच इंदापूर तालुक्याच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. छत्रपती कारखान्याच्या वतीने अध्यक्ष प्रशांत काटे, कार्यकारी संचालक अशोक जाधव व इतर संचालक यांनी स्वागत केले.
यावेळी कारखान्याचे माजी संचालक अविनाश घोलप , माजी संचालक भाऊसाहेब सपकळ यांनी देखील स्वागत केले. सणसर ग्रामपंचायतीच्या वतीने सणसरचे सरपंच रणजीत निंबाळकर, उपसरपंच ज्योत्स्ना भोईटे, यजुर्वेंद्रसिंह निंबाळकर आदींसह सणसर सोसायटीचे अध्यक्ष परशुराम रायते आदींसह इतर मान्यवरांनी स्वागत केले.
छत्रपती कारखान्याच्या कार्यस्थळावर पालखी विसावल्यानंतर छत्रपती कारखान्याचे संचालक डॉ. दिपक निंबाळकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यानंतर भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. टाळमृदंगाच्या गजरात व अभंगाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या ठिकाणच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा पाच वाजता सणसर मुक्कामी दाखल झाला.
दरम्यान, नव्याने बांधण्यात आलेल्या पालखी स्थळ व सभागृहाचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या नवीन वास्तूमध्ये पालखी सोहळा विसावला. सणसर व भवानीनगर परिसरातील विविध संस्था व नागरिकांकडून वारकऱ्यांसाठी विविध सेवा पुरवण्यात आल्या. छत्रपती सहकारी साखर कारखाना तसेच सणसर ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सुविधा पुरवण्यात आल्या होत्या.