फोटो सौजन्य: iStock
दीपक गायकवाड/मोखाडा: मोखाडा तालुक्यात बालमृत्यूचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. अलीकडेच तालुक्यातील जोगलवाडी येथे एका अर्भकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळेच आमच्या बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप पालकांनी केला आहे. मात्र या घटनेतील अधिक धक्कादायक बाब म्हणजे, नाशिक जिल्हा रुग्णालयातून मृत अर्भकाचे पार्थिव वडिलांनी चक्क पिशवीत ठेवून ८० किमीचा बसने प्रवास करत गावी नेले, ही गोष्ट समोर आल्याने आरोग्य यंत्रणेच्या अपयशाचे भयानक चित्र स्पष्ट झाले आहे.
घटनांची सविस्तर माहिती अशी की, अविता सखाराम कवर (वय २६) या गर्भवती महिलेस मध्यरात्री ३ वाजता प्रसूतीवेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी तात्काळ १०८ क्रमांकावर कॉल केला, मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. सकाळी पुन्हा प्रयत्न करूनही दुपारी १२ वाजेपर्यंत वाहन मिळाले नाही. अखेर एका खाजगी वाहनाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथून तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला, पण रुग्णवाहिका तिथेही उपलब्ध नव्हती. आसे येथून रुग्णवाहिका बोलवावी लागली. सायंकाळी ६ वाजता तिला शेवटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संपूर्ण प्रवासासाठी तब्बल १५ तास लागले.
नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ निर्णय; न्याय मिळालेल्यांकडून आमदार संजय केळकर यांचा सत्कार
मोखाडा येथे दाखल झाल्यावर तपासणीत बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मातेस नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे शस्त्रक्रियेनंतर तिचा जीव वाचवण्यात आला. मात्र, उपचारानंतर मृत अर्भकाचा ताबा पालकांवर देण्यात आला. सरकारी किंवा खासगी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आणि आर्थिक अडचणीमुळे सखाराम कवर या पित्याने पिशवीत अर्भक ठेवून बसने ८० ते ९० किमी प्रवास केला. या गोष्टीमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे.
रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही, म्हणून सखाराम कवर यांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. तणावाच्या स्थितीत पालकाचा रोष स्वाभाविक असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर हात उचलल्याचा आरोप पालकांनी केला आहे. एकीकडे बाळ गमावले, पत्नी मृत्यूपासून वाचली आणि वर पोलिसी मारहाण सहन करावी लागल्याने या कुटुंबाची मानसिक अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे.
ही घटना आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळतेकडे बोट दाखवते असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
या घटनेची माहीती घेण्यासाठी ऊपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांनी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आहे. तसेच मद्य प्राशन केलेल्या मृत अर्भकाचे वडिल सखाराम कवर याला पोलिसांनी मारहाण केली आहे का? या बाबतची चौकशी केली आहे.