नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ निर्णय; न्याय मिळालेल्यांकडून आमदार संजय केळकर यांचा सत्कार
“जनसेवकाचा जनसंवाद” या उपक्रमाद्वारे ठाणे परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यांचे समाधान करण्यात आमदार संजय केळकर आघाडीवर आहेत. घर, वीज, पाणी, नाल्यांची सफाई, मोबदला, एसआरए प्रकल्पातील त्रुटी अशा विविध समस्या केळकर यांच्या पुढाकाराने तत्काळ निकाली निघत आहेत. याच उपक्रमादरम्यान न्याय मिळालेल्या नागरिकांनी आमदार केळकर यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
शुक्रवारी खोपट येथील भाजप कार्यालयात पार पडलेल्या “जनसेवकाचा जनसंवाद” कार्यक्रमात वसई येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीच्या मोबदल्याबाबत तक्रार मांडली. एका सरकारी प्रकल्पासाठी जमीन देऊनही मोबदला मिळालेला नव्हता. आमदार केळकर यांनी तात्काळ संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या शेतकऱ्याच्या तक्रारीचा सकारात्मक निकाल लावला. यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.
तसेच ठाण्यातील भीमनगरमधील एसआरए प्रकल्पात क्लस्टर योजनेत चुकीच्या पद्धतीने समावेश झाल्यामुळे अनेक गोरगरीब रहिवाशांचा हक्काच्या घरांचा प्रश्न निर्माण झाला होता. या रहिवाशांनी केळकर यांच्याकडे मदत मागितल्यानंतर, त्यांनी यावर गंभीर दखल घेत एसआरए क्लस्टरमधून वगळण्याचा आदेश अधिकाऱ्यांकडून मिळवला. त्यामुळे आता या प्रकल्पातील बाधित नागरिकांना सोमवारपासून गाळे वाटप करण्यात येणार असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
भाईंदर पाडा येथील नाल्याची सफाई वेळेत न झाल्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती आणि आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने, केळकर यांनी संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधून सफाई कामांना सुरुवात करून दिली. तसेच बीएसयुपी इमारतींतील तक्रारी लक्षात घेऊन, समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कार्यक्रमात बिल्डरने केलेल्या फसवणुकीची तीन प्रकरणे, तसेच सफाई कामगारांना वारसा हक्काचे लाभ मिळवून देण्याची कामगिरीही केळकर यांच्या माध्यमातून पार पडली. यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला.
दौंडकरांचे लोकलचे स्वप्न भंगले! उपनगरी दर्जाच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून नकार
या उपक्रमाला ठाणे आणि परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून बहुतेक तक्रारी जागेवरच निकाली काढण्यात येत आहेत.
विजयनगर को-ऑप. सोसायटीतील शेकडो रहिवाशांना गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित वीज पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत होता. रहिवाशांच्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करत नियमित आणि अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित केला आहे.