पंढरपूर : आषाढी महासोहळ्यासाठी (Ashadhi Yatra 2023) राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत असताना पहिला मानाचा पालखी सोहळा पंढरीत दाखल झाला आहे. सर्वच पालखी सोहळे वारकरी संप्रदायाची पूजनीय असले तरी मानाच्या समजल्या जाणाऱ्या सात पालख्यातील संत मुक्ताबाई (Sant Muktabai Palakhi) यांचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये दाखल झाला आहे. वरुणराजाने जोरदार पर्जन्यवृष्टी करत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या सोहळ्याचे स्वागत केले.
दरवर्षी संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपुरात पहिल्यांदा पोहोचते. त्यानंतर संत नामदेवांची पालखी आणि मुक्ताबाईच्या पालखीकडून इतर मानाच्या पालखींचे पंढरपूरच्या वेशीवर स्वागत केलं जातं. संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यात 1200 महिला आणि 1000 पुरुष भाविक सामील झाले आहेत. मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि मध्य प्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झाले आहेत.
पालखी मार्गात अनेक अडचणी आल्या तरी विठुरायाच्या ओढीने यावर मात करीत हे भाविक पंढरपूरमध्ये पोचले. संत मुक्ताबाई या संत नामदेवांचे आजेगुरु असल्याने या पालखी सोहळ्याच्या स्वागताला संत नामदेवांचे वंशज केशवदास महाराज पोचले होते. या स्वागतानंतर मुक्ताबाई यांच्या पादुकांना चंद्रभागेचे स्नान घालून पालखी सोहळा त्यांच्या दत्त घाटावरील मुक्ताबाई मठात विसावला.
जिल्हा प्रशासनाकडून चोख व्यवस्था
आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाला नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोपाळपूर येथील महाआरोग्य शिबिर, पत्रा शेड, श्री विठ्ठल – रूक्मिणी मंदिर, 65 एकर या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. वारकरी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
29 जुलैला मुख्य सोहळा
येत्या 29 जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समिती व प्रशासनाच्या वतीने दर्शन रांगेत देण्यात येणाऱ्या मॅट, स्वच्छ पेयजल, आरोग्य, शौचालये आदि सुविधा तसेच, महिला भाविकांसाठी देण्यात सुविधांसह अन्य आवश्यक बाबींचा त्यांनी आढावा घेतला.