पंढरपुरात दिवाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची तूफान गर्दी; वाहतूक कोंडीसह खड्ड्यांमुळे लोक त्रस्त
पंढरपूर : भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरमध्ये यंदाच्या दिवाळी हंगामाची जोरदार सुरुवात झाली. भाविकांच्या प्रचंड गर्दीने पंढरीनगरी पुन्हा एकदा गजबजल्या आहेत. गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश तसेच मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर परिसरात दाखल झाले आहेत.
दररोज मुंबईहून तब्बल ४० बसेस पर्यटकांसह पंढरपूरात दाखल होत आहेत, तर खाजगी चारचाकी वाहनेही हजारोंच्या संख्येने पंढरपूर नगरीत प्रवेश करत आहेत. परिणामी, शहरातील सर्व मुख्य मार्गांवर दिवसभर वाहनांची मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी जाणवत आहे. भगवंताच्या दर्शनाचा आनंद घेण्यासाठी विविध भाविकांची स्थळांवर गर्दी उसळली आहे. चंद्रभागेत नौकाविहारासाठी तुडुंब झुंबड असून, पंढरपुरी पेढ्याचाआस्वाद घेत भाविकांनी सुट्टीचा आनंद खुलवला आहे. मुख्य बाजारपेठेत अधूनमधून पडणाऱ्या अवकाळी पावसातही खरेदीला मोठी गर्दी असून, विठ्ठल-रुक्मिणी मातेचीमुर्ती, हिवाळी कपडे आणि पेढा प्रसाद उत्पादने विक्रीचा उच्चांक गाठत आहेत.
दिवाळी सुट्टीमुळे शहरातील हॉटेल्स आणि लॉज पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. अनेक हॉटेल्स ‘हाऊसफुल’ झाल्या असून, खोल्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. टॅक्सींची टंचाई निर्माण झाल्याने अनेक भाविकांना जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, पंढरपूर- पुणे मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था भाविकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धुळीने माखलेले आणि खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवास त्रासदायक झाला आहे. पुणे- पंढरपूर रस्त्यालगत असलेल्या ढाबेवाल्यांना धुळीच्या त्रासामुळे वारंवार रस्त्यावर पाणी मारावे लागत आहे.
अरुंद रस्त्यामुळे होतीये भाविकांची गैरसोय
वाहतूक कोंडी, पार्किंगची अपुरी सोय आणि अरुंद रस्त्यांमुळे भाविकांची मोठी गैरसोय होत असून, अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा करण्याची मागणी केली आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा सामना करण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि पंढरपूर पोलिस प्रशासनाने विश्वजीत घोडके प्रांत अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गासह कंबर कसली आहे.
स्वच्छतेसाठी विशेष पथके तैनात
भाविकांना सुविधा, वाहतूक शिस्त आणि स्वच्छता राखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. दिवाळी हंगामामुळे शहरात व्यापारी उलाढाल वाढली असली तरी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे पंढरपूरच्या भाविकांना सुविधा सक्षम करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.






