वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
परभणी : क्षुल्लक कारणातून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली. नराधम पतीने पत्नीच्या गळ्याभोवती बेल्ट आवळून तिचा खून केला. या हत्येप्रकरणी आरोपी पती राजू आवचार याला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
जिंतूर तालुक्यातील सावंगी येथील संतोष नितनवरे यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली. त्याद्वारे, त्यांची बहिण सुनीता हिचा पती राजू आवचार याने क्षुल्लक कारणातून छळ सुरु केला. त्यामुळे ती एक वर्ष माहेरी वास्तव्यास होती. परंतु, ननंद राजू आवचार याची बहिण हिने विनंती केल्यानंतर सुनीता या ५ मार्च २०२३ रोजी पुन्हा सासरी नांदावयास गेल्या. मात्र, १३ मार्च २०२३ रोजी राजू आवचार याने सुनीता हिचा कंबरेच्या बेल्टने गळा आवळून खून केला, असे नमूद केले.
मुलाच्या कारणावरून वाद
आरोपी आवचार व सुनीता एका खोलीत झोपले होते. मुलाला पाजण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. राजू याने सुनीता यांच्या गळ्यास कबरेचा बेल्ट आवळला आणि निर्घृण खून केला. लहान मुलाचा रडण्याचा आवाज शेजारी राहणाऱ्या आवचार यांची बहिण मंगल नेटके यांना आला. तेव्हा धाव घेवून त्यांनी खिडकीतून पाहिले असता मूल रडत होते व सुनीता ही निपचित पडली होती. तर राजू बाजूस बसलेला होता. नेटके यांनी तात्काळ मुलगा कैलास यास बोलावून पोलिसांना खबर दिली, असे ननवरे यांनी या तक्रारीतून नमूद केले.
न्यायालयात आरोपी झाला निरूत्तर
दरम्यान, जिंतूर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला. तसेच संपूर्ण तपास करत पुरावे गोळा केले व संबंधित आरोपीच्या विरोधात प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती नंदेश्वर यांच्यासमोर खटला उभा केला. त्यावेळी आरोपीने हत्या कशाप्रकारे केली हे सांगितले नाही. त्यामुळे जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षातर्फे मांडलेल्या युक्तिवादातून तसेच शवविच्छेदन अहवालातील माहितीच्या आधारे न्यायाधीश श्रीमती नंदेश्वर यांनी संबंधित आरोपी राजू आवचार यास जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.