संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बिजलीनगरच्या नागसेन झोपडपट्टीत सोमवारी दुपारी धारदार हत्याराने हल्ला करून २५ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. वैभव भागवत थोरात असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्ल्यात त्याच्या डोक्यावर, छातीवर, दोन्ही हातांवर आणि पायांवर वार केले आहेत. भीषण हल्ल्यामुळे त्याचा उजवा हात कोपऱ्यापासून वेगळा झाला, तर डाव्या हातावरही अनेक वार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेला वैभव थोरात आरोपी योगेश अनंत गायकवाडचा मेहुणा होता. वैभव आणि योगेश यांच्यात पूर्वी अनेकदा वाद झाले होते. तसेच वैभवने योगेशच्या बहिणीला माहेरी येऊ न दिल्यामुळे योगेश संतप्त होता. या रागातून त्याने काही साथीदारांसह वैभववर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी आरोपी योगेश अनंत गायकवाड (वय २५), अनिल आनंद बनसोडे (वय १९), महेश आप्पालाल कोळी (वय १९) आणि शिवम मधुकर वालुंज (वय १६) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटना वैभव काही मित्रांसोबत पत्राशेडमध्ये बसला असताना अचानक घडली. आरोपींनी धाड टाकून त्याच्या हात, छाती आणि डोक्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झाल्यानंतर वैभव जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे काम वेगाने सुरू करण्यात आले. अवघ्या काही तासांत आरोपींना अटक करण्यात आली. “पूर्ववैमनस्यातून ही हत्या केली गेली. घटनेनंतर आरोपींना काही तासांत ताब्यात घेतले,” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांनी सांगितले.
भररस्त्यात एकावर कोयत्याने सपासप वार
स्वारगेट भागात दुधानी गँगने दहशत माजवली आहे. मोक्का रिर्टन आणि सराईतांनी दहशत माजवून एकावर कोयत्याने वार केले आहेत. कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला आहे. नंतर परिसरात हवेत हत्यारे फिरवून दहशत माजवत गोंधळ घातला. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास डायसप्लॉट येथे ही घटना घडली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांची दहशत कायम असल्याचेही दिसत आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात भक्तीसिंग दुधानी, शक्तीसिंग दुधानी, गोविंदसिंग टाक, आकाशसिंग दुधानी याच्यासह सात जणांविरोधात भारतीय न्याय संहिता १०९, १८९, १८९(२), १९१(२), १९१(३), आर्म ४ (२५), मपोका ३७, (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आबा सरोदे (वय ३९) यांनी तक्रार दाखल केली आहे.