पारगडचा शासनाच्या संरक्षित यादीत समावेश (फोटो- सोशल मीडिया)
किल्ले पारगडाला इतिहासाच्या पानांत मानाचे स्थान
शासनाने जाहीर केली अंतिम अधिसूचना
पारगडच्या संवर्धन आणि जतनाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय
चंदगड: चंदगड तालुक्यातील किल्ले पारगडाला इतिहासाच्या पानांत मानाचे स्थान असून, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या सज्जतेची साक्ष देत उभा आहे. तो आता अधिकृतपणे राज्य संरक्षित स्मारक झाला आहे. राज्य शासनाने याबाबतची अंतिम अधिसूचना नुकतीच जाहीर केली. पारगडच्या संवर्धन आणि जतनाच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक मानला जात असून, गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या पारगडाला न्याय मिळवून देणारा ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ मध्ये गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पारगड किल्ला बांधला होता. त्याचे पहिले किल्लेदार म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे होते. इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाचा पुत्र शहाजादा मुअज्जम आणि खवासखान यांनी पारगडवर हल्ला केला. या भीषण युद्धात गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी धारातीर्थी पडले. विठोजी आणि त्यांच्या सती गेलेल्या धर्मपत्नी तुळसाबाई यांच्या समाध्या आजही पारगडावर शिवकालीन शौर्याची साक्ष देत उभ्या आहेत. त्यामुळे इतिहासाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याचे संवर्धन व जतन व्हावे, म्हणून महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे या विभागाकडे पाठपुरावा सुरू होता.
मातीच्या ढिगाऱ्याखाली लपून होतं एक अनोखं रहस्य! कोकणातील ‘या’ गडावर सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा
हा विभाग व अवशेष अधिनियम, १९६० (महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२) अंतर्गत कलम ४ (१) नुसार राज्य शासनाने ३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रारंभिक अधिसूचना काढली होती. त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत कोणत्याही हरकत आली नाही. त्यामुळे शासनाने पारगड किल्ल्याला राज्यसंरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा अंतिम निर्णय घेतला.
या निर्णयानुसार मौजे मिरवल (ता. चंदगड) येथील गट क्रमांक २१ मधील १९.४३ हेक्टर आर. क्षेत्रफळ असलेला पारगड किल्ला आता राज्य संरक्षित स्मारकांच्या अधिकृत यादीत समाविष्ट झाला आहे. यामुळे गडाच्या ऐतिहासिक वास्तू, अवशेष, तोफखाना व समाधी यांचे शासकीय पातळीवर संरक्षण व संवर्धन होणार असल्याने गडाला राज्यसंरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्याने इतिहासप्रेमी, शिवभक्त आणि पर्यटन क्षेत्रासाठी हा मोठा दिलासा मानला जात असून, भविष्यात गडाच्या संवर्धनासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना राबवल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मातीच्या ढिगाऱ्याखाली लपून होतं एक अनोखं रहस्य! कोकणातील ‘या’ गडावर सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा
तालुक्यात किल्ले पारगडसह गंधर्वगड, कलानंदीगड, महिपाळगड हे ऐतिहासिक किल्ले आहेत. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवणे आवश्यक असून हे ओळखून त्यासाठी गडसंवर्धन आराखडा तयार केला आहे. त्यात आता पारगड किल्ला राज्यसंरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्याने गडसंवर्धन मोहिमेला अधिक गती मिळणार असल्याचे आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितले.विभागाने घेतली दखलतालुक्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन व्हावे म्हणून पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडे जून २०२२ मध्ये पाठपुरावा केला होता. त्याची दखल या विभागाने घेतल्याचे समाधान असून पारगडला राज्यसंरक्षित स्मारक करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे हा किल्ला विकासासाठी कामी येणार असल्याचे माजी आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.






