समीर मुजावर, कोल्हापूर: कोरोनाचं(Corona) नुसतं नाव घेतलं तरी भल्याभल्यांना दरदरून घाम फुटतो..घसा खवखवतो..पण गेल्या १५ दिवसांत कोल्हापूरच्या (kolhapur) प्रिया पाटील(Priya Patil) या २० वर्षीय तरुणीने पीपीई किट परिधान करून आजपर्यंत स्वतः ड्रायव्हींग करत प्रिया पाटीलने ६५ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा स्मशान भूमीत नेले. इतकेच नव्हे तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्या मृतदेहांची चिता रचायला सुद्धा तिने मदत केली.प्रसंगी काही मृतदेहांना भडाग्नी द्यायलासुद्धा ही कोरोना योद्धा प्रिया डगमगली नाही.
[read_also content=”वाराणसीमधल्या रस्त्यावर पाणी साचल्यावर सीताराम येचुरींनी केली नरेंद्र मोदींवर टीका – म्हणाले, ‘पंतप्रधान आता वाराणसीला व्हेनिस बनवल्याचा दावा करतील’ https://www.navarashtra.com/latest-news/communist-party-leader-sitaram-yechuri-criticized-narendra-modi-after-bad-situation-of-varanasi-nrsr-144147.html”]
कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजमध्ये शास्त्र शाखेच्या पहिल्या वर्षात शिकणारी प्रिया पाटील ही अवघी २० वर्षीय तरुणी आहे. कोल्हापूरमधील जाधववाडी परिसरात ती आपल्या कुटुंबासोबत राहते.सुशिक्षित कुटुंबातील सदस्य असल्याने तिचे आचरण सुद्धा चांगले आहे.प्रियाचे वडील शिरोली औद्योगिक वसाहतीत उद्योजक तर आई विमा एजंट म्हणून काम करते. प्रिया करत असलेल्या कार्याला तिच्या आईवडीलांचा पूर्ण पाठिंबा आहे.
आपणही समाजासाठी काहीतरी करावं अशी प्रियाला इच्छा होती.वडिलांनी तिला ड्रायव्हिंग शिकवले होते. शिकलेल्या ड्रायव्हिंगचा उपयोग आपण कोरोना काळात अशा प्रकारे करावा ही तिचीच कल्पना. या कामात तिला पूर्ण समाधानही मिळतंय असे ती सांगते.
कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयाला अर्थात सीपीआर हॉस्पिटलला बालाजी कलेक्शन या कपड्यांचे व्यापारी प्रशांत पोकळे व भवानी फ़ाउंडेशन हर्षल सुर्वे यांनी संयुक्तपणे कोविड सेवेसाठी दिलेल्या शववाहिकेचे स्टिअरिंग सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत प्रिया पाटील सांभाळते.
“पहिल्यांदा पीपीई कीट घालून हे काम करतांना खूप अस्वस्थ झाले,पण आता सवय झाली आहे.” असं ती सांगते.भवानी फाऊंडेशनचे स्वयंसेवक , हॉस्पिटल कर्मचारी आणि स्मशानभूमीतील पालिका कर्मचारी हे सर्वजण प्रियाला सहकार्य करतात. त्यामुळे या कामात प्रिया उस्फुर्तपणे काम करत आहे.
स्मशानभूमीत महिला जायलासुद्धा धजावत नाहीत.त्या स्मशानभूमीत जाऊन, चिता रचण्यातही मदत करणाऱ्या आणि प्रसंगी मृतदेहांना भडाग्नी द्यायला सुद्धा पुढे असणारी प्रिया खूप धाडसी आहे.
कोरोना झालेल्या रुग्णांचे नातेवाईक आणि आप्तस्वकीय अशा मृत झालेल्या शवांना हात लावायला सुद्धा धजत नाहीत अशा ठिकाणी कोविडचे मृतदेह उचलून शववाहिकेतून स्मशानभूमीत न्यायचं काम प्रिया धाडसाने करते आहे. तिच्या या कार्याचं कौतुक सुद्धा भरभरून केलं जातं आहे..