सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
ICC T-20 Ranking : आयसीसीने ताजी टी२० रँकिंग जाहीर केली असून भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने यावेळी आपली कमाल दाखवली आहे. सूर्याने टी२० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये लक्ष्यवेधी झेप घेतली आहे. सूर्यकुमार यादवला आयसीसी टी२० रँकिंगमध्ये पाच स्थानांचा फायदा होऊन सातव्या स्थानी पोहचला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमार यादवने मागील सलग दोन अर्धशतकांमुळे त्याला त्याची रँकिंग सुधारण्यासाठी चांगलाच फायदा झाला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादवने पहिल्या तीन सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्याने पहिल्या सामन्यात ३२ धावा, दुसऱ्या सामन्यात नाबाद ८२ आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद ५७ धावांची खेळी केली आहे. त्याच्या सलग दोन अर्धशतकांमुळे त्याच्या रँकिंगमध्ये चांगलीच सुधारणा झाल्याचे दिसत आहे.
भारतीय फलंदाजांमध्ये, स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. तर तिलक वर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. तथापि, दुखापतीमुळे तिलक वर्मा सध्याच्या टी२० मालिकेतून बाहेर आहे. तसेच रायपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ३२ चेंडूत ७६ धावांची तुफानी खेळी करणारा इशान किशनला देखील फायदा झाला असून तो ६४ व्या स्थानावर पोहोचला आहे. शिवम दुबेला नऊ स्थानांचा फायदा होऊन ५८ व्या स्थानावर पोहोचला आहे आणि रिंकू सिंग १३ स्थानांनी झेप घेऊन ६८ व्या स्थानावर पोहोचला आहे.
दुबईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या २-१ टी-२० मालिकेत शानदार कामगिरी बजावणारा अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रान दोन स्थानांनी झेप घेऊन १३ व्या स्थानी विराजमान झाला आहे. तर रहमानउल्लाह गुरबाज तीन स्थानांनी झेप घेऊन १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. मालिकावीर दर्वेश रसुली २९ स्थानांनी झेप घेऊन ८७ व्या स्थान पटकावले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये ४७ चेंडूत नाबाद ८६ धावांची खेळी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करामने फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप २० मध्ये एंट्री केली आहे.
हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : भारतीय फिरकीपटू कामगिरी उंचावणार? न्यूझीलंडविरुद्ध दबदबा ठेवणार सूर्याआर्मी
टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत, अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानने पाच स्थानांनी उडी घेऊन नवव्या स्थानावर बाजी मारली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चार स्थानांनी १३ व्या स्थानावर आला आहे, तर रवी बिश्नोई १३ स्थानांनी १९ व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.
भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने देखील त्याच्या रँकिंगमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. तीन सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्याने तो गोलंदाजी क्रमवारीत १८ स्थानांनी पुढे जाऊन ५९ व्या स्थानावर पोहोचला आहे, तर फलंदाजी क्रमवारीत तो दोन स्थानांनी पुढे जाऊन ५३ व्या स्थानावर पोहोचला आहे. हार्दिक पंड्या अष्टपैलूंच्या यादीत एका स्थानाने पुढे जाऊन तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.






