फोटो सौजन्य - Social Media
गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या सशस्र आत्मसमर्पणाची ऐतिहासिक घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माओवादी केंद्रीय समितीचे सर्वोच्च नेते भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपालरावसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले. त्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह संविधानाचे प्रतीमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारले. या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवाद पूर्णपणे संपुष्टात येण्याचा मार्ग तयार झाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी भूपतीसारख्या माओवादी नेत्यांनी या भागात माओवाद पसरवला होता, आणि आज त्याच्याशी संबंधित ६१ सदस्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनी अन्य माओवादी नेत्यांनाही मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले. माओवाद्यांनी समता आणि न्याय फक्त संविधानातूनच मिळेल, याची जाणीव झाल्यामुळे आत्मसमर्पण केले आहे.
राज्य सरकारने आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचे पुनर्वसन सुनिश्चित केले असून त्यांना उद्योगांमध्ये प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूण ३ कोटी १ लाख ५५ हजार रुपयांचा पुनर्वसन निधी जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली पोलिसांनी सातत्याने माओवादविरूद्ध मोहिमा आखून माओवादाला जेरबंद व नेस्तनाबूत केले. विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे नवीन माओवाद्यांची भरती रोखली, या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस दल आणि केंद्रीय राखीव दलाचे अभिनंदन करत गडचिरोली पोलीस दलाला १ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला. तसेच सजग राहण्याचे आणि लोकांचा यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.
गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येत असून, हा जिल्हा ‘स्टील मॅग्नेट’ बनत आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना ९० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याच्या अटीवरच परवानगी दिली जात असून, १ लाख स्थानिकांना रोजगार देण्याचा मानस आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गडचिरोलीत पायाभूत सुविधा उभारताना जल, जमीन, जंगल यांचा विनाश होऊ नये यासाठी ५ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पुढील काळात गडचिरोलीला देशाचे ग्रीन स्टील हब तयार करण्यासाठी योजना आखल्या जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी प्रास्ताविकात सांगितले की, २०२१ पासून आतापर्यंत १४० माओवाद्यांना अटक करण्यात आली, तर ८१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, ९३ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यावेळी नक्षल पीडित कुटुंबांना धनादेशांचे वितरणही करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी उपस्थितांचे आभार मानले.