'पे अँड पार्क' चा ठेका मराठी तरुणांना द्या, अन्यथा रेल्वे स्थानकात आंदोलन करू; मनसैनिकांची चिपळूण रेल्वे स्थानकात धडक (फोटो सौजन्य-X)
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण रेल्वे स्थानकातील ‘पे अँड पार्क’ चा एका परप्रांतीय ठेकेदाराला दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी पदाधिकारी आणि मनसैनिकांसमवेत येथील रेल्वे स्थानकात धडक देत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. हा ठेका मराठी तरुणांना देण्यात यावा, अशी मागणी केली. अन्यथा मनसेतर्फे रेल्वे स्थानकात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी पदाधिकारी व मनसैनिकांसमवेत अन्याय विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी गेल्या महिनाभरापूर्वी कामथे येथील नदीत टँकरद्वारे सांडपाणी सोडण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण कार्यालयावर धडक देत जाब विचारला.
तर आता चिपळूण रेल्वे स्थानकात ‘पे अँड पार्क’ चा ठेका परप्रांतीय ठेकेदाराला दिला असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी पदाधिकारी व मनसैनिकांसमवेत येथील रेल्वे स्थानकात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. इथे सुशिक्षित तरुण असतांना रेल्वे स्थानकातील ‘पे अँड पार्क’चा ठेका परप्रांतीय ठेकेदाराला का देण्यात आला? हा ठेका परप्रांतीय ठेकेदाराला देऊन इथल्या तरुणांवर अन्याय झाला आहे. याबाबत सुधारणा झाल्यास रेल्वे स्थानकात आंदोलन छेडू असा इशारा दिला. यानंतर मनसेतर्फे इथल्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ‘राज साहेब ठाकरेंचा विजय असो’, ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला.
यानुसार कोकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकावर सुरु असलेल्या पे अँड पार्कची सेवेसाठी बाहेर राज्यातील परप्रांतीय युवक कार्यरत आहेत. येथील स्थानिक युवक सक्षम असूनही त्यांना या प्रकारच्या रोजगाराच्या संधीपासून दूर ठेवण्यात आले आहे. येथील रेल्वेसाठी स्थानिक लोकांच्या जमिनी दिल्या गेल्या आहेत. परंतु येथील स्थानिकांना या ‘पे अँड पार्क’ चा ठेका न देता परप्रांतीयांना या ‘पे अँड पार्क’ चा ठेका देण्यात आला. हा येथील स्थानिक (तरुण) लोकांवरती होणारा अन्याय आहे. परंतु या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अन्याय होवू देणार नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मराठी माणसाला या ठिकाणी पहिल्यांदा न्याय मिळाला पाहिजे. असे झाले नाही तर महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने ‘पे अँड पार्क’ इथे परप्रांतीयांना चालू देणार नाही. आज येथील असंख्य तरुण रोजगाराची संधी पाहत आहेत. परंतु ही संधी प्ररप्रांतीय हिसकावून घेणार असेल, तर त्याला महाराष्ट्र नव निर्माण सेना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. तरी इथल्या स्थानिक तरुणांना हा ठेका देला नाही तर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रेल्वे स्थानक येथे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मनसे चिपळूण तालुका अध्यक्ष संदेश साळवी, चिपळूण शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारी, उपशहराध्यक्ष विनोद चिपळूणकर, माजी विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सुशांत मोरे, अथर्व कदम, प्रणय कदम आदी उपस्थित होते.
मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी या विषयासंदर्भात कोकण रेल्वेचे अधिकारी श्री. बापट यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून जाब विचारला. परप्रांतीयांना कोकण रेल्वेमध्ये ठेका मिळतो. परंतु, मराठी माणसाला ठेका मिळत नाही. हा मराठी भूमिपुत्रावर माणसांवरती अन्याय आहे. कोकणवासीयांच्या जमिनी कोकण रेल्वेला संपादित केल्या असून मात्र, कोकणी माणूस या ठेक्यापासून किंवा या उत्पन्नाच्या साधनांपासून दूर ठेवला जात आहे, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे वैभव खेडेकर यांनी ठणकावून सांगितले. तर काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या पॅन्टरी डिपार्टमेंट मध्ये एका प्रवाशाला मारहाण झाल्याचा देखील मुद्दा उपस्थित करून या दोन्ही प्रकरणांची दखल घ्यावी. अन्यथा मनसे स्टाईलने जाब विचारला जाईल, असा इशारा या अधिकाऱ्यांशी बोलताना दिला आहे.