'आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही'; छगन भुजबळांची टीका (फोटो -सोशल मीडिया)
इंदापूर : मुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आधीच भाष्य केले आहे. योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर मागण्या वाढतात आणि त्यामुळे आंदोलने सुरू होतात, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (दि. २४) इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना केले.
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी, ‘त्याचं काय घेऊन बसलात? आज एक बोलेल, उद्या एक बोलेल’ अशा शब्दात हा प्रश्न उडवून लावला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होत नसल्याच्या प्रश्नावर, मात्र भुजबळ यांनी बोलण्यास नकार दिला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येणार असल्याच्या चर्चेबाबतही, ‘आमच्याकडे अशी काही चर्चा नाही. कोण काय बोललं ते तुम्ही सांगा. कधी कधी मीडियाकडे आमच्यापेक्षा जास्त माहिती असते, असे म्हणत प्रश्नाला बगल दिली.
मुख्यमंत्री फडणवीस हे पवार साहेबांच्या कौतुकास पात्र आहेत. पवार साहेब हे स्पष्टवक्ते नेते आहेत. जे चांगलं काम करतात त्यांना पाठिंबा देतात. ते महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.
परंपरा हरवत चालल्या आहेत
एकेकाळी विधीमंडळामध्ये शिस्त होती, परंपरा होत्या आणि सरकारला कैचीत पकडण्यासाठी चर्चा जोरात चालायची, मात्र आज परिस्थिती वेगळी आहे, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी सध्या विधानमंडळात घडणाऱ्या प्रकारांवर भाष्य केले. ते म्हणाले, मी १९८५ पासून विधानमंडळात आहे. मी अनेक मंत्रिपदे भूषवली. त्या वेळी केशवराव धोंडगे, दत्ता पाटील, विलासराव देशमुख, शरद पवार, गणपतराव पाटील असे अनेक विद्वान नेते होते. नितीन गडकरी, राम नाईक, प्रतापराव पाटील, एन. डी. पाटील यांसारखे अभ्यासू विरोधी नेतेही सभागृहात होते. सभागृहात टोकाच्या चर्चा झाल्यावरही बाहेर सर्वजण एकत्र बसून चहा घेत असत. सभागृहाच्या कार्यपद्धतीला आणि परंपरांना मान दिला जात होता. आता मात्र या सगळ्याचं चित्र पालटलं आहे. आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, काही लोक खरंच कामासाठी येतात. लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेऊन येतात. परंतु काहीजण फक्त फिरण्यासाठी, कोणालातरी भेटून काम सांगण्यासाठीच येतात. काहींचा तर वेगळाच धंदा झालेला आहे.