बदलापूरातील स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! बदलापूर ते अक्कलकोट बससेवा सुरु
बदलापूर येथील स्वामी समर्थ भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बदलापूर ते अक्कलकोट या नवीन बससेवेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते या बससेवेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या बससेवेमुळे स्वामी भक्तांना आता बदलापुरातून थेट अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बदलापुरात मोठ्या संख्येने असलेल्या स्वामी समर्थ भक्तांची गैरसोय दूर व्हावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन शुक्रवारी रात्री बदलापूर एसटी स्थानकातून अक्कलकोटसाठी पहिली बस रवाना झाली.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन आशिष दामले यांच्यासह माजी नगरसेवक संभाजी शिंदे, रुचिता घोरपडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख किशोर पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश चिटणीस हेमंत रुमणे, एसटी महामंडळाचे ठाणे विभागीय उपव्यवस्थापक धनंजय शिंदे, विठ्ठलवाडी आगार प्रमुख गावडे, बदलापूर एसटी स्थानक नियंत्रक प्रमोद मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अविनाश देशमुख यांनी परिवहन सेवा सुरू करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानले आणि बदलापूरकरांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कॅप्टन आशिष दामले यांनी अविनाश देशमुख यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि एसटी प्रवासी व कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बदलापूर एसटी स्थानकाचा बारामतीच्या धर्तीवर विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
बदलापूर ते अक्कलकोट बससेवेची आसन क्षमता 40 आहे. या बससाठी प्रवासी राज्य परिवहन मंडळाच्या वेबसाईटवर, तसेच रेड बस ॲपवर व बदलापूर एसटी स्थानकावर ऑनलाईन किंवा ऑफलाइन तिकीट बुक करू शकतात. तिकीट दर 805 रुपये आहे, तर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध्या तिकीटात प्रवास करता येईल, म्हणजे 403 रुपये. तसेच, 75 वर्षांवरील वृद्ध नागरिकांसाठी प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे.