File Photo : stamp-papers
यवतमाळ : शासकीय कामासह शैक्षणिक व विविध व्यवहारासाठी चालणारा 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर बाद ठरविण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्यांना 500 रुपयांचा मुद्रांक खरेदी करावा लागत आहे. नोव्हेंबर महिन्यात अखेरचे 100 रुपयांचे अडीच हजार मुद्रांक विक्री करण्यात आले तर 500 रुपयांचे तब्बल साडेसहा हजार मुद्रांक विक्री झाले.
हेदेखील वाचा : Pune Metro: स्वारगेट-कात्रज मार्गावर चार मेट्रो स्थानकं होणार; महामेट्रो स्वखर्चाने उभारणार, महापालिकेचा प्रस्ताव
सप्टेंबर महिन्यात 100 रुपयांचे 18 हजार 440 मुद्रांक विक्री झाले. त्याचे मूल्य 18 लाख 44 हजार इतके होते. 500 रुपयांचे तीन हजार 316 मुद्रांक विक्री झाले. त्याचे मूल्य 16 लाख 58 हजार एवढे होते. सप्टेंबर महिन्यात एकूण 35 लाख दोन हजार रुपये मुद्रांक विक्रीतून प्राप्त झाले. ऑक्टोबर महिन्यात 100 रुपयांचे 13 हजार 300 मुंद्राक 13 लाख 30 हजार, 500 रुपयांचे 9 हजार 128 मुद्रांक 45 लाख 64 हजार असे एकूण 58 लाख 94 हजार रुपये मूल्य आहे.
नोव्हेंबर महिन्यात 100 रुपयांचे अखेरचे दोन हजार 490 मुद्रांक 2 लाख 49 हजार तर 500 रुपयांचे 6 हजार 510 मुद्रांक 32 लाख 55 हजार असे एकूण 35 लाख 4 हजार रुपये मूल्य आहे. तीन महिन्यांतील मुद्रांक विक्रीची आकडेवारी पाहता 100 रुपयांच्या मुद्रांकाचीच अधिक विक्री दिसून येते. जिल्हाधिकारी, तहसील, पुरवठा, पंचायत समिती, शिक्षण विभाग आदी विभागांतील शासकीय योजना, विविध कामांसाठी प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्रीचे किरकोळ व्यवहार आदी कामांत नागरिकांना स्टॅम्प पेपरची गरज भासते.
पूर्वी 20, 50 च्या स्टॅम्प पेपरवर व्हायची कामे
पूर्वी 20, 50 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरच अधिक शासकीय कामे व आर्थिक व्यवहार होत होती. कालांतराने हे दोन्ही स्टॅम्प पेपर बंद करून 100 रुपयांचा मुद्राक आणण्यात आला. या मुंद्राकावर विविध प्रतिज्ञापत्र, किरकोळ आर्थिक व्यवहार होत होते. तसेच मुद्रांकाचे हे दरही नागरिकांना रास्त व वाजवी वाटत होते. परंतु, महिनाभरापूर्वी 100 रुपयांऐवजी 500 रुपयांचा मुद्राक विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर होणारी कामे आता 500 रुपयांवर गेली असल्याने कमालीची नाराजी पसरली आहे.
हेदेखील वाचा : देवेंद्र फडणवीस आज घेणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; पंतप्रधान मोदी, अमित शहांसह अनेक बडे नेते राहणार उपस्थित






