राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत... (File Photo : Temperature)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात पूर्वेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे, गुरुवारपासून मुंबईसह आसपारच्या परिसरात तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ही स्थिती आठवडाभर टिकून राहू शकते. अरबी समुद्रात उच्च दाब असल्याने समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग मंद राहील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबईचे तापमान 39-40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. बुधवारी सांताक्रूझमध्ये 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्याच वेळी, आर्द्रता 28 टक्के नोंदवली गेली. कुलाब्याचे तापमान 33.4 अंश नोंदवले गेले. हवामान ज्या पद्धतीने बदलत आहे, त्यामुळे तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. मुंबईत तापमान 39 ते 40 अंशांपर्यंत पोहोचू शकते, तर ठाण्यात तापमान 41 अंशांपर्यंत जाऊ शकते. फेब्रुवारीमध्ये मुंबईचे कमाल तापमान 38 अंशांवर पोहोचले होते.
सर्वाधिक तापमान 41.7 अंशांवर
आयएमडीच्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात मुंबईत सर्वाधिक 41.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. हा आकडा 28 मार्च 1956 रोजीचा असला तरी आता उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे उन्हात काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. उष्णतेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी छत्री, टोपी किंवा स्कार्फ वापरा.
खूप थंड पाणी पिणे टाळावे
तुम्ही थंड पेये देखील घेऊ शकता. पण खूप थंड पाणी पिणे टाळा, कारण ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आणि भाज्या खा. जसे टरबूज, काकडी यांचा आहारात समावेश करावा. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हे उपाय तुम्हाला निरोगी ठेवतील.
फेब्रुवारीमध्येच बसल्या उन्हाच्या झळा
फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या झळा बसल्या. मुंबईत हंगामाच्या सुरुवातीला सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यात तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले. पण जोरदार वाऱ्यामुळे उष्णता थोडी कमी झाली. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात वाढ होत आहे. कोकण प्रदेशात ३७ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्यानंतर भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवार आणि बुधवारी दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यामुळे तापमानात वाढ झाली होती.