मुंबई : मुंबईसाठी 238 वंदे भारत मेट्रो (एसी लोकल) रेल्वे बोर्डाकडून मंजूर करण्यात आली होती. मात्र, ही मंजुरी मिळूनही योजना तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (MRVC) 4 जुलै रोजी निविदा काढण्याची नोटीस काढली होती. मात्र, वंदे मेट्रोची निविदा पुढे ढकलल्याची माहिती एमआरव्हीसीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
या निविदेत 238 एसी लोकल व्यतिरिक्त 35 वर्षांसाठी त्यांची देखभाल आणि दोन डेपो बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. राजकीय विरोधानंतर ऑगस्ट 2022 मध्ये मध्य रेल्वेने डझनभर एसी लोकल सेवा बंद केल्या होत्या. तब्बल दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 238 एसी लोकलच्या फाइलला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली. यावेळी एसी लोकलचे नाव बदलून ‘वंदे भारत मेट्रो’ असे करण्यात आले.
एसी लोकलची मागणी वाढली
मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये दररोज सरासरी 1200 प्रवासी आणि पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक सेवेत 1600 प्रवासी प्रवास करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक एसी लोकलमध्ये सरासरी दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत एसी लोकल ट्रेनमधून दररोज 63 हजार प्रवासी प्रवास करत होते. आता पश्चिम आणि मध्य रेल्वेवर दररोज एकूण 135 एसी लोकल सेवा धावत आहेत, ज्यामध्ये दररोज सुमारे 1.53 लाख लोक प्रवास करत आहेत. रेल्वे फक्त दहा रेकने सर्व सेवा चालवत आहे.
टेंडर अचानक का केलं रद्द?
ही निविदा पुढे ढकलण्याची दोन प्रमुख कारणे सूत्रांनी दिली आहेत. ही दोन्ही कारणे राजकीय घडामोडीशी संबंधित आहेत. वास्तविक, एमआरव्हीसी ही राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यातील संस्था आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांतर्गत, रेल्वे आणि राज्य यांना 50:50 टक्के भागीदारी ठेवायची आहे.