Pimpalgaon Joga Dam News: पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा फुटला; २५ ते ३० एकर शेतीचे मोठे नुकसान
Pimpalgaon Joga Dam News: मंगळवारी पहाटेच्या सुमारास पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याला मोठे भगदाड पडून कालवा फुटल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरातील सुमारे २५ ते ३० एकर बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले असून, काही शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे. ऐन उन्हाळ्यात कालवा फुटल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कालव्याला अचानक भगदाड पडले. त्यानंतर कालव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड वाढला. घटनेच्या वेळी कालव्यातून तब्बल २६० क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. पाण्याचा जोर इतका मोठा होता की, ते थेट शेतांमध्ये घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या दुर्घटनेचा सर्वाधिक फटका संतोष निमसे, सुनील निमसे, पंकज हांडे, शेखर हांडे, शंकर हांडे आणि विश्वास हांडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांना बसला आहे. संतोष निमसे आणि सुनील निमसे यांच्या पाच एकर शेतातील सुपीक मातीच वाहून गेली असून, काढणीला आलेली पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, निमसे कुटुंबाचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेखर हांडे यांच्या ऊस शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उसाचे पीक धोक्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी संतोष निमसे यांनी तातडीने धरण प्रशासनाशी संपर्क साधून पाणी बंद करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर कालव्याचे पाणी बंद करण्यात यश आले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, कालव्याला मोठे भगदाड पडल्यामुळे त्याच्या दुरुस्तीस बराच वेळ लागू शकतो. हा कालवा अनेक गावांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असल्याने दुरुस्तीचे काम लांबल्यास नागरिक आणि जनावरांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. “कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पाटबंधारे विभागाने पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी नवनाथ सुकाळे आणि पंकज हांडे यांनी केली आहे.
“शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पिकांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे महसूल विभागाच्या सहकार्याने बाधित क्षेत्राचा तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करून, नियमानुसार शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्नशील राहील.”
— (गणेश नान्नोर)
कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्र,१ नारायणगाव.
कालवा फुटल्याची माहिती मिळताच आम्ही तातडीने धरणातून होणारा विसर्ग बंद केला आहे. प्राथमिक पाहणीनुसार, कालव्याच्या विशिष्ट भागात भगदाड पडल्याचे दिसून येत असून, तांत्रिक पथकाद्वारे याची सविस्तर तपासणी केली जात आहे. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, जेणेकरून उन्हाळ्यातील आवर्तन विस्कळीत होणार नाही आणि नागरिकांची पाण्याची सोय लवकर पूर्ववत होईल.”
— आर जी हांडे
उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग पिंपळगाव जोगा).
”पहाटेच्या वेळी अचानक पाण्याचा आवाज आला आणि बघता बघता उभ्या पिकात पाणी शिरलं. डोळ्यादेखत आमची पाच एकर शेती उध्वस्त झाली आहे. फक्त पीकच गेलं नाही, तर पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की शेतातली सगळी सुपीक माती वाहून गेली आहे. आता तिथे पुन्हा शेती करायची म्हणलं तरी वर्षानुवर्षे लागतील. आमचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून सरकारने तातडीने मदत द्यावी, अन्यथा आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल.”
संतोष निमसे (बाधित शेतकरी)
”ऐन उन्हाळ्यात रक्ताचं पाणी करून ऊस आणि इतर पिके जगवली होती. आता कुठे पीक काढणीला आलं होतं, पण कालवा फुटल्याने सर्व कष्टावर पाणी फिरलं. शेतात गुडघाभर पाणी साचलं असून पिके सडू लागली आहेत. ही प्रशासनाची दिरंगाई आहे, कालव्याची वेळेवर देखभाल केली असती तर आज ही वेळ आली नसती. पाटबंधारे विभागाने केवळ आश्वासनं न देता प्रत्यक्ष मदत करावी.”






