काँक्रीटच्या जंगलात हरवली वारुळे (फोटो- सोशल मिडिया)
हळूहळू दुर्मिळ होत चालली मुंग्यांची वारुळे
हवामानातील अस्थिरता यामुळे मुंग्यांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात
अभ्यासकांकडून व्यक्त केली जात चिंता
सुनयना सोनवणे / पुणे: ग्रामीण भागातील मोकळ्या शेतात, बांधावर, रानावनात किंवा झाडाझुडपांच्या आसपास सहज दिसणारी मुंग्यांची वारुळे आता हळूहळू दुर्मिळ होत चालली आहेत. एकेकाळी पावसाळ्यापूर्वी (Navarashtra Special) जमिनीवर उठून दिसणारी ही मातीची ‘निसर्गरचना’ आता अनेक भागांत शोधूनही सापडत नाही. पर्यावरणातील वेगाने होणारे बदल, वाढते काँक्रीटीकरण, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर आणि हवामानातील अस्थिरता यामुळे मुंग्यांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले असून परिसंस्थेतील हा सूक्ष्म पण महत्त्वाचा घटक लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
जगभरात मुंग्यांच्या १५ हजारांहून अधिक जाती आढळतात. त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे ५७ प्रकारच्या जाती आणि प्रजातींची नोंद आहे. मात्र या जीवसृष्टीचा स्वतंत्र अभ्यास करणारी संस्था राज्यात नसल्याची खंत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करतात. मुंग्या या ‘इकोसिस्टम इंजिनियर्स’ म्हणून ओळखल्या जातात. त्या जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, माती भुसभुशीत ठेवतात आणि अनेक हानिकारक कीटकांचे नियंत्रणही करतात.
आपल्याला जमिनीवर दिसणारी मोठी वारुळे ही मुंग्यांची वाटत असली तरी बहुतांश वेळा ती वाळवीची असतात. जमिनीवरील संरचनेपेक्षा मुंग्यांचे खरे जग हे जमिनीखाली असते. असंख्य भुयारे, मार्ग, धान्यसाठे, विश्रांती कक्ष, अन्नसाठवण जागा आणि अगदी ‘डर्ट चेंबर’सारखी स्वच्छतेसाठीची स्वतंत्र व्यवस्था अशा अत्यंत शिस्तबद्ध रचनेत मुंग्यांची वसाहत उभी असते. काही जातींमध्ये मृत मुंग्यांसाठी स्वतंत्र ‘स्मशानभूमी’ही असते. ‘ओलिक ॲसिड’ या रसायनाच्या वासावरून मृत मुंगी ओळखून तिला वसाहतीबाहेर नेले जाते.
‘हॉटस्पॉट’! काँक्रीटच्या जंगलात हरवला ‘गारवा’; उष्णतेच्या लाटेत होरपळतेय ‘आपलं पुणे
काही मुंग्या झाडांवर घरटी विणतात, तर काही जमिनीखाली बुरशीची लागवड करून तिच्यावर जगतात. त्यामुळे त्यांच्या वसाहती एखाद्या सुबक शहरासारख्या मानल्या जातात. एका वारुळात लाखो ते कोट्यवधी मुंग्या राहू शकतात. विशेष म्हणजे वारुळ जमिनीवर जितके दिसते, त्यापेक्षा तिप्पट-चौपट भाग जमिनीखाली विस्तारलेला असतो. मात्र शेतीतील वाढता रासायनिक वापर, जमिनीची धूप, बांधकामांसाठी होणारी खोदाई, मोकळ्या जागांचे काँक्रीटीकरण आणि वृक्षतोड यामुळे मुंग्यांना योग्य अधिवास मिळेनासा झाला आहे. वाढते तापमान आणि अनियमित पावसामुळे त्यांचे जीवनचक्रही विस्कळीत होत असल्याचे शेतकरी सांगतात.
तज्ज्ञांच्या मते, मुंग्यांची परिसंस्था आणि जैवविविधता टिकवण्यासाठी मोकळ्या जमिनी जपणे, स्थानिक वृक्षलागवड वाढवणे, रासायनिक औषधांचा मर्यादित वापर करणे आणि नैसर्गिक अधिवास संरक्षित ठेवणे अत्यावश्यक आहे. निसर्गातील शिस्त, परिश्रम आणि संघटनेचे प्रतीक मानली जाणारी ही वारुळे अदृश्य होत जाणे ही केवळ एका छोट्या जीवाची नव्हे, तर संपूर्ण पर्यावरणव्यवस्थेसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
‘मुंगी हा आकाराने छोटा पण पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचा जीव आहे. जमिनीच्या आरोग्यापासून अन्नसाखळीपर्यंत प्रत्येक स्तरावर त्यांचे योगदान असते. वारुळे कमी होणे म्हणजे परिसंस्थेतील असमतोलाची घंटा आहे.’
– प्रा. पूजा सोनसाळे, पर्यावरण अभ्यासक
‘शेतात फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा सर्वाधिक फटका मुंग्यांना बसतो. ही रसायने थेट त्यांचा नाश करतात किंवा त्यांच्या अन्नसाखळीवर परिणाम करतात. त्यामुळे वारुळे टिकून राहत नाहीत.’
– सुरज जाधव, शेतकरी






