मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी बंड करत चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार (MVA) अल्पमतात आले. बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी ३० जून रोजी फ्लोर टेस्ट (Floor Test) करण्याचे निर्देश दिले होते. राज्यपालांच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (Resign) दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले असून भाजपने (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाशी बोलणी सुरु केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी, हिंदुत्त्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ आली नसती, अशी खोचक टीका केली. उद्धव ठाकरे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले नसते, तसेच त्यांनी हिंदुत्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ आली नसती. सरकार बनवण्याचा दावा कधी करणार, त्यावर निर्णय व्हायचा बाकी आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
दरम्यान, भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात १८ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्री असे २८ मंत्री असणार आहेत. तर, शिंदे गटाला ६ कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार, असे बोलले जात आहे.