वसई । रविंद्र माने : वसईच्या चुळणे गावातून बेपत्ता झालेल्या तिन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात माणिकपूर पोलिसांना यश आले असून, तुंगारेश्वरच्या घनदाट जंगलातील अंधारात ७ किमी पायपीट करुन त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यांना फूस लावून पळवून नेणार्या तरुणाला ही अटक करण्यात आली आहे.
वसईच्या चुळणे गावात राहणार्या १५ आणि १३ वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणी त्यांच्या १५ वर्षीय मोलकरीणसह बेपत्ता झाल्या होत्या. या मुलींच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी ४ पथके तयार केली होती. या मुलींच्या वडीलांच्या तबेल्यात काम करणारे दोन तरुणही याचवेळी बेपत्ता झाले होते. त्यामुळे त्यांनीच या तिघींना फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज बांधत पोलीसांच्या पथकाने त्यांच्या घरापासून सिसीटिव्ही फुटेजची तपासणी केली.
तब्बल २०० ठिकाणचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासल्यावर तीन मुली दोन तरुणांसोबत वसई रेल्वे स्टेशन येथून लोकलने दादर, बोरिवली, नालासोपारा येथे प्रवास करुन नालासोपारा स्थानकात उतरल्याचे दिसून आले. तिथून रिक्षा पकडून ते वसई फाटा येथे उतरले आणि रानशेतपाडा, पेल्हार येथे जातांना दिसून आले. त्यामुळे पोलीसांच्या पथकाने रानशेतपाडा परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासून स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळवली. त्यावेळी सदर मुली तुंगारेश्वर येथील डोंगरावर आढळून आल्याचे पोलीसांना समजले.
त्यानंतर पोलीसांच्या पथकाने रात्री ८ वाजल्यापासून तुंगारेश्वर डोंगर पिंजून काढण्यास सुरुवात केली. ४ किलोमीटर पायी डोंगर चढून तीन तास घनदाट जंगल तपासल्यावर सदर ३ मुली दोन तरुणांसह सापडल्या. त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा रात्रीच्या अंधारात ४ तासांची पायपीट करुन पोलीसांना त्यांना सुखरुप डोंगरावरुन खाली आणले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी उपनिरिक्षक सनिल पाटील, रोहिणी डोके, हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, गोविंद लवटे, आनंदा गडदे, प्रविण कांदे, पुजा कांबळे यांनी ही कामगिरी केली.