File Photo : Heavy Rain
सांगली : कोयना आणि चांदोली धारण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा या नद्यांना पूर आला आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढत असल्याने सांगली जिल्हा पुराच्या छायेत गेला आहे. सध्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले असून, प्रतिबंधात्मक उपयोजना सुरू आहेत.
सांगली जिल्ह्यातील सुमारे १०४ गावे बाधित होतात. त्यापैकी ३० गावांना जास्तीचा फटका बसतो. त्यामुळे या भागात उपयोजना करण्यासाठी सर्व यंत्रणांच्या जबादारी निश्चित करण्यात आल्या आहेत. पूर आल्यास एकूण १ लाख ८ हजार १६८ ग्रामस्थ तर १ लाख ७६ हजार १८५ पशुधन बाधित होते. दरम्यान, गुरुवारी दुपारपर्यंत शिराळा तालुक्यातील ५७ ग्रामस्थांचे आणि ६७७ जनावरांचे तर वाळवा तालुक्यातील ५३ ग्रामस्थ आणि ८३ जनावरे अशी एकूण ११० ग्रामस्थांचे ७६३ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
चार तालुक्यातील रस्ते, पूल पाण्याखाली
जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज आणि पलुस तालुक्यातील २७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर ज्या भागात रस्ते, पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, ते देखील महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने बंद केले जाणार आहेत.
जिल्हा परिषद यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर
“एकूण पाऊस आणि धरणांमधून करावा लागणारा विसर्ग पाहता पूर येण्याची निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय रजा रद्द करण्यात आल्या आहेत, सर्वांना मुख्यालयात थांबणे बंधनकारक केलं आहे. सर्वात आधी पशुधन स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी पुरवठ्याच्या तपासण्या रोज केल्या जातील, महसूल आणि पोलीस प्रशासनाशी समनव्य ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.”
– तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी
शाळांना सुट्टी देण्यासाठी मागणी
जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यातील १०४ गावात पुराचा फटका बसतो. या गावातील शाळांना सुट्टी देण्याची मागणी होत आहे, सध्या याबाबत शिक्षण विभाग यांच्याकडून जिल्हाधिकारी समनव्य ठेवून निर्णय घेणार आहेत, अशी माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.
विजेच्या खांबाना फ्लॅगिंग करण्याच्या सूचना
सन २०१९ च्या महापुरात वसगडे येथे मोठी दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये नदी काठावरील पाण्याखाली गेलेल्या विजेच्या खांबाचा अंदाज न आल्याने बोट बुडाली होती. ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता, अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, म्हणून नदी काठावरील विजेच्या खांवावर फ्लॅगिंग करण्याच्या सूचना महावितरण विभागाला देण्यात आल्या आहेत.