फोटो सौजन्य - Social Media
कर्जत शहर व तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून, याविरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने २९ एप्रिल रोजी महावितरणच्या कार्यालयात अचानक धडक दिली. या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची धांदल उडाली. समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या मे महिन्याच्या आत वीज समस्येवर उपाय न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
गेल्या काही आठवड्यांपासून शहरात दिवस व रात्र अशा दोन्ही वेळेस वीज पुरवठा खंडित होत असल्याने सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्येही यासंदर्भात आंदोलन झाले होते, मात्र त्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. सोशल मीडियावरून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात ॲड. कैलास मोरे, रंजन दातार, राजेश लाड, दीपक बेहरे, स्विटी बार्शी आदी सदस्य सहभागी होते. त्यांनी म्हटले की, गेल्या वर्षी महावितरणने लेखी आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात काहीच सुधारणा झालेली नाही. वीज खंडित होण्याबाबत ना कोणतीही पूर्वसूचना दिली जाते ना त्याचे कारण स्पष्ट केले जाते.
महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी इन्कमरमध्ये बिघाड झाल्याने वीज खंडित झाली होती. वंजारवाडी फिडर बंद नव्हता, मात्र नगरपरिषदेच्या तांत्रिक समस्येमुळे पाणीपुरवठा अडथळीत झाला असावा. एक्सप्रेस फिडरचं काम सुरू करण्यासाठी नगरपरिषदेनेच पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. संघर्ष समितीचे ॲड. कैलास मोरे यांनी इशारा दिला की, यापुढील आंदोलन लोकशाही मार्गाने नसेल. जर वेळेत उपाय झाले नाहीत, तर महावितरणला जनतेच्या उद्रेकासाठी जबाबदार धरले जाईल.