महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रसोल केमिकल्स या कारखान्यात विषारी वायूची गळती होण्याचा प्रकार आज घडला. या घटनेत विषारी वायूची बाधा झाल्याने एका कामगाराचा मृत्यु झाला तर चार कामगार बेशुद्ध पडले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईत हलविण्यात आले आहे. उर्वरित तिघांवर महाड येथे उपचार सुरु आहेत.
आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या कारखान्यात हायड्रोजन सल्फाईड या वायूची गळती झाली. कारखान्यात काम करत असलेल्या संतोष मोरे, नागेश चव्हाण, परमेश ठाकूर, इंद्रजीत पटेल आणि अखिल महेंद्र सिंग हे पाच जण या वायूची बाधा झाल्याने बेशुद्ध झाले. त्यांना महाड येथील न्यू लाईफ रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात येत असताना अखिल महेंद्र सिंग याचा रस्त्यात मृत्यु झाला. तर संतोष मोरे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईत हलविण्यात आले आहे. उर्वरित तिघांवर न्यू लाईफ रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.
या घटनेची नोंद औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या आधी देखील ह्याच कारखान्यामध्ये असाच प्रकार घडला होता.